महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजू शेट्टींना खोडा घालण्यासाठी भाजपाचं नवीन नेत्यांना बळ? तुपकरांच्या मुद्द्यावरून 'या' नेत्याचा भाजपाला टोला - नवीन नेत्यांना बळ

Jalinder Patil On BJP Strategy : संपूर्ण महाराष्ट्रावर आपली पकड असावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपाने विविध समाजातील आणि वर्गातील प्रस्थापित नेत्यांना शह देण्यासाठी नवीन नेतृत्व उभं करणं आणि त्याला बळ देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. (Jalinder Patil criticized BJP) त्यातूनच आता शेतकरी संघटनेचे नेते म्हणून रविकांत तुपकर यांना मोठे केलं जात असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, हे दुर्दैवी राजकारण असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shektari Sangathan) प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Jalinder Patil On BJP Strategy
जालिंदर पाटील

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2023, 5:05 PM IST

शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि भाजपाच्या धोरणाविषयी बोलताना जालिंदर पाटील

मुंबईJalinder Patil On BJP Strategy :महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात अधिकाधिक जागा निवडून याव्यात यासाठी महायुतीच्या वतीनं जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्व मतदारसंघांचा आढावा घेत शक्य तिथे ताकद वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच नवीन राजकीय नेते जन्माला घालणं आणि त्यांना बळ देणं, हा डाव भाजपाकडून आखला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांना शेतकरी संघटनेतून फोडून बळ देण्याचा प्रयत्न भाजपा करत असल्याची चर्चा आहे. (Farmer Leader Ravikant Tupkar) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Farmer leader Raju Shetty) यांची ताकद कमी करण्यासाठी हा डाव आखला जात आहे. कारण राजू शेट्टी हे महाविकास आघाडी सोबत जाण्याची शक्यता असल्यानं त्यांची ताकद कमी करण्याचा हा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे. (Jalinder Patil)


मोहरे गळाला लागतात ही खंत-पाटील :या संदर्भात बोलताना जालिंदर पाटील म्हणाले की, रविकांत तुपकर हे गेली दोन-तीन वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकांना उपस्थित राहात नाहीत. नुकत्याच झालेल्या ऊस परिषदेच्या व्यासपीठावरही ते आलेले नाहीत. त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. ती असणं स्वाभाविकही आहे. अलीकडच्या काळामध्ये कुणी म्हणतंय त्यांना भाजपा बळ देत आहे. तर कुणी म्हणतंय ते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत तर कोण म्हणतंय ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यांच्या विविध पक्षांच्या नेत्यांबरोबर गाठीभेटी सुरू आहेत. नुकतचं त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं. या आंदोलन स्थळी सदाभाऊ खोत यांनी त्यांची भेट घेतली. या सर्व गोष्टी शंका-कुशंकांना वाव देणाऱ्या आहेत. विशेषतः फोडाफोडीच्या राजकारणात भाजपा ही चाल खेळत आहे आणि ती त्यांना नवी नाही. मात्र, आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोहरे भाजपाच्या राजकारणाला बळी पडत आहेत ही खंत आम्हाला वाटते, अशी प्रतिक्रिया जालिंदर पाटील यांनी व्यक्त केली आहे.


भाजपाचे हेच राजकारण-महादेव जानकर :भाजपा हा संधी शोधणारा पक्ष आहे. सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी अशा पद्धतीचे प्रयोग केले जातात. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या विरोधात लढण्यासाठी कोणाची ताकद जास्त आहे हे लक्षात घेऊन भाजपाने आपल्याला सोबत घेतले होते. मात्र, एखाद्या व्यक्तीची गरज सरली की भाजपा काय करतो, हे आपण पाहातच आहात, अशा शब्दात माजी मंत्री आणि आमदार महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.


ही भाजपाची जुनीच खेळी-भावसार :या संदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार म्हणाले की, रविकांत तुपकर यांची विदर्भातील पाच ते सहा मतदारसंघांवर बऱ्यापैकी पकड आहे. राजू शेट्टी यांच्यासोबत अनेक वर्ष शेतकरी संघटनेत काम केलेल्या रविकांत तुपकरांना आपल्याकडे घेतले तर आपोआप राजू शेट्टी यांची ताकद कमी होईल. हे लक्षात घेऊनच भाजपाने रविकांत तुपकरांना अन्नत्याग आंदोलनानंतर मुंबईत सह्याद्रीवर बोलावून त्यांच्याशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यांचं शेतकऱ्यांमधील आणि राजकारणातील महत्त्व वाढेल, यासाठी जाणीवपूर्वक त्यांना बळ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून राजू शेट्टींची ताकद काही अंशी कमी होईल तर विदर्भात काही मतदारसंघांमध्ये आपल्याला ताकद वाढवता येईल हाच भाजपाचा यामागचा विचार असल्याचं भावसार म्हणाले.

आतापर्यंत 'या' नेत्यांना दिली उभारी :भाजपाच्या वतीनं हा पहिला प्रयोग नाही तर यापूर्वीसुद्धा अनेकदा ही खेळी खेळली गेली आहे आणि ती यशस्वी ठरली आहे, हे स्पष्ट होते असंही भावसार म्हणाले. यापूर्वी भाजपाने महादेव जानकर यांच्या रुपानं धनगर समाजातील नेतृत्वाला उभं केलं. यानंतर त्यांचे महत्त्व कमी करण्यासाठी त्यांनी राम शिंदे यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. राम शिंदे यांचं महत्त्व वाढू लागलं आहे असं दिसताच त्यांनी गोपीचंद पडळकरांना मोठं करायला सुरुवात केली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना आधी सोबत घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेत्यांना शह देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राजू शेट्टी यांना संपवण्यासाठी सदाभाऊ खोत यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपाची ही खेळी यापूर्वीसुद्धा अनेक वेळा समोर आलेली आहे आणि या निमित्तानं ती अधिक स्पष्ट झाली असंही भावसार म्हणाले.

हेही वाचा:

  1. शरद पवारांकडे 'तेव्हा' पंतप्रधानपदाची संधी होती, मात्र त्यांनी ती घेतली नाही; प्रफुल पटेल यांचा गौप्यस्फोट
  2. काहीजणं पावसात भिजण्याचं नाटक करतात; राष्ट्रवादीतील वादावर पुतण्यानं काकांना 'धो धो धुतले'
  3. पंतप्रधान मोदींचं दुबईत जोरदार स्वागत; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाले दुबईतील भारतीय ?

ABOUT THE AUTHOR

...view details