मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीच्या काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीमधील स्फोटकांची जबाबदारी जैश-उल-हिंद या संघटनेने घेतली आहे, अशा प्रकरची व्हायरल पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. मात्र, या संदर्भात स्वतः जैश-उल-हिंद या संघटनेने समोर येऊन त्यांच्या संघटनेने मुकेश अंबानी यांना कुठलीही धमकी दिली नाही, असे स्पष्ट केले आहे.
जैश-उल-हिंदने काढलेले परिपत्रक. काय म्हटले आहे पत्रकात -
जैश-उल-हिंदने जारी केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, जैश-उल-हिंद कडून उद्योगपती मुकेश अंबानी यांना खंडणीची मागणी करणारी तसेच त्यांना धमकी देण्यात आल्याची एक पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. मात्र, या घटनेशी आमचा कुठलाही संबंध नसून आमच्याकडून मुकेश अंबानी यांना कुठलीही धमकी देण्यात आलेली नाही आहे. या घडलेल्या या घटनेशी आमचा कुठलाही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. टेलिग्राम वर प्रसारित झालेल्या पोस्टर आणि लिंकशी आमचा कुठलाही संबंध नाही, असेही जैश-उल-हिंदने म्हटले आहे.
याबरोबरच आम्ही कुफ्र (अनेक देवतांना मानणारे) कडून कुठल्याही प्रकारचे पैसे घेत नाही व कुठल्याही भारतीय उद्योगपतींशी आमचा वाद नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बीजेपीविरोधात आमची लढाई सध्या सुरू आहे. आम्ही शरीयासाठी झटत असून पैशांसाठी आमचा लढा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
व्हायरल पोस्ट -
मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवर जैश-उल-हिंदसारखी कुठलीही संघटना सध्या अस्तित्वात आहे का? याबद्दल कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, जैश-उल-हिंद नावाची संघटनेचे टेलीग्राम अकाउंट आहे. यावर काही पोस्ट फिरत असल्याचंही सांगितलं जात आहे.
काय आहे प्रकरण -
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराजवळ स्फोटके असणारी गाडी आढळल्याने गुरुवारी रात्री मुंबईमध्ये खळबळ उडली होती. कंबाला हिल परिसरातील अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीमध्ये जिलेटिन स्फोटकांच्या 20 कांड्या पोलिसांना सापडल्या होत्या. या घटनेनंतर अंबानी यांच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास क्राईम ब्राँचकडे सोपवण्यात आला होता.
हेही वाचा -अंधेरी कोर्टाकडून कंगना रणौत विरोधात वॉरंट जारी
तपासासाठी मुंबई पोलिसांकडून 10 पथके तयार
या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून 10 तापस पथके बनवण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाला वेगवेगळी कामे वाटून देण्यात आली आहेत. पोलीस खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पथकाकडे पेडर रोडच्या परिसरात असलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेज एकत्रित करण्याचे काम देण्यात आले आहे. यामध्ये पेडर रोड परिसरात असलेल्या सर्व हाउसिंग सोसायटी यांचेही सीसीटीव्ही फुटेज या पथकाकडून गोळा केले जात आहेत. तर दुसऱ्या तपास पथकाकडे मुंबई ट्राफिक पोलिसांच्या मुख्यालयातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईत दाखल झालेली ही स्कॉर्पिओ गाडी कुठे आणि कशा प्रकारे फिरली याचा पूर्ण तपास करण्याची जबाबदारी या पथकाकडे देण्यात आली आहे. तिसऱ्या पथकाकडून मुंबई पोलिसांचा मुख्यालय व क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम देण्यात आले आहे. चौथ्या टीमकडे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या संशयित लोकांची माहिती गोळा करण्याचे काम देण्यात आलेले आहे. तसेच पाचव्या तपास पथकाकडे फॉरेन्सिकच्या पथकासोबत मिळून काम करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच संशयित व्यक्तींच्या संदर्भात पुरावे गोळा करण्याचे काम यांच्याकडे देण्यात आले आहे.
स्कॉर्पिओ कार विक्रोळीतून झाली होती चोरी
मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर उभी असलेली स्कॉर्पिओ कार ही आणि ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर 18 फेब्रुवारीला विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेली गाडी एक असल्याची माहिती आता समोर आली होती. ठाण्याच्या एका ऑटोमोबाईल दुकान मालकाची ती गाडी असल्याची माहिती पुढे आली होती.
जिलेटिन कांड्यांचे नागपूर कनेक्शन
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. याप्रकरणाचे नागपूर कनेक्शन समोर आले होते. या गाडीमध्ये आढळून आलेले इमलशन एक्सप्लोजीव अर्थात जिलेटिन कांड्यांची निर्मिती नागपूरमधील सोलर एक्सप्लोजीव लिमिटेड कंपनीमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे.