मुंबई -कोरोना संकटामुळे रोजीरोटीवर गदा आली असताना राज्य सरकारने मात्र आयटीआय विद्यार्थ्यांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये प्रशिक्षणासहित रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. असे मलिक यांनी सांगितले. मुलुंड येथील शासकीय आयटीआय आणि पंचतारांकीत आयटीसी हॉटेल सोबत आज (शनिवार) राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. मुलुंड आयटीआय संस्थेच्याअंतर्गत डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच संगणक कार्यशाळेचे (आयटी लॅब) मंत्री मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, मियावाकी वृक्षारोपणाची पाहणी आणि वृक्षारोपणही करण्यात आले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक डॉ. अ. म. जाधव, संस्थेचे उपप्राचार्य संदीप परदेशी, निरीक्षक अनिल सदाफुले यावेळी उपस्थित होते.
'ऑन द जॉबची संधी मिळणार'
युवक-युवतींना फक्त प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना शाश्वत रोजगाराची उपलब्धता होणेही गरजेचे आहे. त्यासाठी आयटीआयसोबत विविध औद्योगिक आस्थापनांचे सामंजस्य करार करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व आयटीआयमध्ये अशाच पद्धतीने प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने कौशल्य विकास विभागामार्फत निर्णय घेण्यात येत आहेत. आतापर्यंत ५० हून अधिक नामांकीत संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असे मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. मुलुंड आयटीआयमधील फुड अँड बेव्हरेजेस (अन्न आणि पेयपदार्थ) सर्व्हिस असिस्टंट या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांना आयटीसी हॉटेल लिमिटेडमार्फत सहा महिन्यांपर्यंत अद्ययावत असे ऑन द जॉब ट्रेनिंग घेण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे मलिक म्हणाले.