मुंबई:काश्मीरसारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करणे योग्य नाही... 'द काश्मीर फाइल्स' हा केवळ एक चित्रपट आहे, येत्या निवडणुकीत त्याचा कोणाला राजकीय फायदा होईल, असे वाटत नाही. निवडणुका येईपर्यंत चित्रपट निघून जाईल असेमत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटा वरुन सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. या चित्रपटाचे प्रमोशन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले या चित्रपटाचा भाजपला फायदा होईल असे बोलले जात असुन दोन्ही बाजुने वाद विवाद सुरु आहे. या पार्श्वभुमीवर राऊत यांनी हे विधान केले आहे.
राऊत यांनी म्हणले आहे की, 'द काश्मीर फाईल्स' या सिनेमाचा ज्वर ओसरत आहे. काश्मीर हा देशासाठी आणि देशातील जनतेसाठी अत्यंत संवेदनशील विषय आहे. आजपासून नाही, फाळणीपासूनच हा संवेदनशील विषय आहे. अनेक वर्षापासून काश्मीरवरून राजकारण सुरू आहे. आम्हाला वाटलं होतं मोदी सरकार आल्यावर राजकारण थांबेल. पण ते वाढतच आहे. या चित्रपटात ज्या गोष्टी दाखवल्या आहेत, त्या असत्य आहेत. असे अनेक लोक म्हणत आहेत. पण तो सिनेमा आहे. ज्याला तो पाहायचा ते पाहतील. ज्यांनी पाहिलाय आणि ज्यांना त्यातील ज्या गोष्टी खटकतात त्यावर ते बोलतील. एवढं स्वातंत्र्य या देशात आपल्याला आहे. असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये बेरोजगारी हटवण्यासाठी सर्वात मोठी गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं? पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणून अखंड हिंदुस्थानचं स्वप्न पूर्ण करू अशी घोषणा केली होती. तो पाकव्याप्त काश्मीर कधी जोडताय?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.