मुंबई Israel Hamas War : युद्धामुळं इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आपल्या मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारनं 'ऑपरेशन अजय' (Operation Ajay) राबवलं असल्याचं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी सांगितलं. 'ऑपरेशन अजय'चं स्वागत करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या या उपक्रमास शुभेच्छा देत सहकार्याची भूमिका असल्याची माहिती भारतातील इस्रायलचे राजदूत कोबी शोशानी यांनी दिली आहे.
भारत सरकारनं राबवलं 'ऑपरेशन अजय' :इस्रायलमध्ये सध्या भीषण युद्धजन्य परिस्थिती ओढावल्यानं इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना आपल्या मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन अजय राबवलं (India launches Operation Ajay) आहे. या ऑपरेशनचं स्वागत करत भारतातील इस्राईलचे जनरल काऊन्सिल कोबी शोशानी यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, इस्रायलमध्ये 18 हजार भारतीय नागरिक असून त्यामध्ये एक हजार विद्यार्थी आहेत. या सर्वांना सुखरूप भारतात परत आणण्यासाठी भारतीय दूतावासाशी समन्वय साधला जात आहे. त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करण्यात येत आहे. इस्रायलच्या इकॉनॉमीमध्ये जे भारतीय आपले योगदान देत आहेत, त्यांचा आम्ही आदर करतो. भारताच्या 'ऑपरेशन अजय'ला इस्रायल सरकारकडून पूर्णपणे सहकार्य असणार आहे. पुढे पाहता सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थिती संपुष्टात आल्यानंतर पुन्हा भारतीयांनी इस्रायलमध्ये यावे. आम्ही त्यांचं स्वागत करू.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं ट्विट : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचे इस्रायलने स्वागत केलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली. 'ऑपरेशन अजय' असं या मोहिमेला नाव देण्यात आल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय. इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन अजय' सुरू करण्यात येत असून, त्यासाठी विशेष चार्टर विमानं आणि इतर व्यवस्था करण्यात येणार आहे.
आपत्कालीन संयुक्त सरकार स्थापन : इस्रायलमध्ये 18 हजार भारतीय नागरिक अभ्यासासाठी किंवा कामासाठी वास्तव्यास आहेत. यापैकी सुमारे एक हजार विद्यार्थी, तर अनेक आयटी व्यावसायिकांसह हिरे व्यापारी, नर्सेस देखील आहेत. दरम्यान, इस्रायलनं हमासशी लढण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकत्र करून आपत्कालीन संयुक्त सरकार स्थापन केलंय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, माजी संरक्षण मंत्री आणि मध्यवर्ती विरोधी पक्षनेते बेनी गॅट्झ यांच्या भेटीत, संयुक्त सरकार स्थापन करण्यास सहमती दर्शविली. हे संयुक्त सरकार पूर्णपणे युद्धावर लक्ष केंद्रित करेल. गॅट्झच्या नॅशनल युनिटी पार्टीनं जारी केलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आलीय. हमासची लष्करी शाखा, अल कासम ब्रिगेडनं दावा केलाय की, त्यांचे दहशतवादी अजूनही इस्रायलमध्ये आहेत आणि लढा सुरू ठेवणार आहेत, अशा वेळी हे सरकार स्थापन करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
- Israel Hamas Conflict : हमासला काय हवंय? अनेक वर्षांपासून इस्त्रायलबरोबर आहे संघर्ष
- Israel Hamas War : हमासच्या रॉकेट हल्ल्यात एक भारतीय महिला जखमी, दूतावासानं दिली प्रकृतीची अपडेट
- USA in Support of Israel : हमास इस्रायल युद्ध आणखी भडकणार! अमेरिकेची इस्रायलला 'ही' मोठी मदत