मुंबई Israel Embassy letter to India On Sanjay Raut :शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हिटलरसंदर्भात केलेल्या ट्विटवर थेट इस्रायलनं आक्षेप घेतलाय. इस्रायलनं या विधानासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहिलं नाराजी व्यक्त केलीय. इस्रायली दूतावासानं यहुदींसंदर्भात करण्यात आलेल्या चुकीच्या विधानावरुन परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही एक पत्र लिहिलंय. या पत्रात इस्रायली दुतावासानं ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांची तक्रार केलीय. संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स (पूर्वीचं ट्विटर) प्लॅटफॉर्मवरुन यहुदींविरोधात एक पोस्ट केली होती.
काय होती राऊतांची पोस्ट : खासदार संजय राऊत यांनी 14 नोव्हेंबर रोजी गाझामधील रुग्णालयामधील 'गंभीर परिस्थिती'बद्दल भाष्य करताना X वर एक पोस्ट केली होती. हिंदीमध्ये पोस्ट करत संजय राऊत यांनी, "हिटलर ज्यू समाजाचा एवढा द्वेष का करत होता? हे आता तुम्हाला समजतं का?" असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. राऊत यांनी ही पोस्ट नंतर डिलीटही केली होती. मात्र तोपर्यंत इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. राऊत यांनी ही पोस्ट डिलीट करण्यापूर्वी ती 2,93,000 हून अधिक वेळा पाहण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलनं भारत सरकारला पाठवलेल्या ई-मेलमध्ये हा स्क्रीनशॉटही अटॅच केलाय.