मुंबई Institute Of Science :स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात अनेक दर्जेदार शिक्षण संस्थांची स्थापना झाली. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईतील 'इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'. मात्र आता ही संस्था इतिहास जमा होणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. निधीअभावी येथे प्राध्यापकांची भरती थांबली आहे. त्यामुळे या संस्थेचं आणि येथे असलेल्या अणुस्रोतांचं करायचं काय? असे प्रश्न जाणकारांनी उपस्थित केलेत.
संस्थेनं अनेक दर्जेदार विद्यार्थी घडवले : मुंबईच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स' मधून विज्ञान आणि रसायनशास्त्राचे अनेक विद्यार्थ्यी घडले. यापैकी पीएचडी झालेले अनेक विद्यार्थी आज देशात आणि देशाबाहेर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र गेल्या २० वर्षापासून या संस्थेला सरकारी आणि खाजगी निधी मिळणं जवळजवळ बंद झालंय. यामुळे आता ही संस्था बंद होते की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
प्राध्यापकांची भरती थांबली : याबाबत माजी कुलगुरू प्राध्यापक डॉ. अरुण सावंत सांगतात की, 'प्राध्यापकांची भरती प्रक्रिया १० ते १५ वर्षांपासून थांबली आहे. पुढे हे काम चालवायला दुसरी फळीच तयार झाली नाही. कंत्राटी भरत्या सुरू झाल्या. मात्र पुढे पगार वाढले आणि दात्यांकडून येणार निधी कमी पडू लागला. संशोधन हेच या संस्थेचं ध्येय होतं. पंडित नेहरू आणि डॉ. होमी भाभा यांच्या प्रयत्नातून ही संस्था उभी राहिली. आता महाराष्ट्र शासनाकडे या संस्थेची जबाबदारी आहे', असं ते म्हणाले.
सरकारची भूमिका काय : या मुद्यावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 'संस्था बंद होणार नाही', असं ते म्हणाले. 'संस्थेची फक्त इमारत जुनी झाली आहे. मात्र संस्था बंद होईल असा अपप्रचार केला जातोय. शासन या संस्थेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देईल. मध्यंतरी के.सी. महिंद्रा यांच्याकडून ३ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मिळाला होता. शासन देखील या संस्थेला पुन्हा उभारी देण्याबाबत सकारात्मक विचार करत आहे', असं त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा :
- Theaters History In Mumbai : दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणी तर गणेश टॉकीज जमीनदोस्त, काय आहे रंगभूमी व चित्रपटगृहांचा इतिहास?