मुंबई -दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई केल्यानंतरही मुंबईची तुंबते. यामुळे नालेसफाईच्या कामांवर नेहमीच टीका होत आली आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत पाणी तुंबण्याचे प्रकार का घडतात? असा सवाल करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. नालेसफाईत बेजबाबदारपणा करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका? अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. त्यावर २८ ते ३० टक्के वाढीव किमतीच्या निविदांची चौकशी करून अहवाल सादर करा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले.
नालेसफाईवर सत्ताधारी नाराज -
मुंबईत यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना नालेसफाई करण्यात आली. नालेसफाईसाठी कामगार मिळत नसतानाही कंत्राटदारांनी नालेसफाई केल्याचा दावा पालिका प्रशासनाचा आहे. नालेसफाईचा दावा केल्यानंतरही यावर्षी मुंबई अनेकवेळा तुंबली. त्यानंतरही पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना जास्त रक्कम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. वाढीव दरामुळे पालिकेला नाहक आर्थिक फटका बसत असल्याचे सांगत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी संबंधित प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारार्थ परत पाठवण्याची उपसूचना मांडली. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे वांद्रे पश्चिमचे पाणी पूर्वमध्ये येत असल्याचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले. एच पूर्व भागातील चमडावाला नाला, गोळीबार नाला, वाकोला नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. तर चतुर्थ श्रेणी कामगारांची भरती करून नालेसफाई केल्यास परिणामकारक काम होईल, असे राजूल पटेल म्हणाल्या.