महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हवाई दलाच्या कसरतींनी जिंकले मुंबईकरांचे मन; 'एअर शो' पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवर नागरिकांची गर्दी - Air Show Mumbai

Indian Air Force Air Show Mumbai : मुंबकरांचे मनोरंजन करण्यासाठी मरीन ड्राईव्ह (Marine Drive) समुद्र किनाऱ्यावर भारतीय हवाई दलातर्फे आज (रविवारी) चित्तथरारक एयर शो आयोजित करण्यात आला होता. (Sarang Helicopters) तो बघण्यासाठी हजाराेच्या संख्येने मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यावर उपस्थिती दर्शविली. यावेळी सारंग हेलिकॉप्टर आणि वायू दलाच्या विमानांनी मनमोहक कसरती सादर करून मुंबईकरांची मने जिंकली. (Air Force Aircraft)

Air force exercises
मरीन ड्राइववर नागरिकांची गर्दी

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 5:01 PM IST

Updated : Jan 14, 2024, 5:34 PM IST

मुंबईतील एअर शो पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी

मुंबई Indian Air Force Air Show Mumbai:रविवारी मुंबईत मरीन ड्राईव्ह परिसरात डोळ्याचे पारणे फेडणारा भारतीय हवाई दलाचा शो झाला. हा चित्तथरारक शो पाहण्यासाठी संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात हजारो मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. सर्वांच्या नजरा आसमानावर खिळल्या होत्या. तर हे क्षण आपल्या कॅमेरामध्ये टिपण्यासाठी हजारो मोबाईल कॅमेरे सज्ज झाले होते. भारतीय वायुदलातील हवाई कसरती करणारी 'सारंग' ही हेलिकॉप्टरची टीम आणि विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी 'सूर्य किरण' (Surya Kiran Team) ही टीम तैनात होती.



मुंबईकरांची वाहवा मिळवली:रविवारची दुपार मुंबईकरांसाठी विशेष होती. मुंबईतील क्वीन नेकलेस समजला जाणारा मरीन ड्राईव्ह परिसर हवाई दलातील विमाने त्याचबरोबर हेलिकॉप्टर यांच्या आवाजाने पूर्णत: दणाणून गेला होता. भारतीय वायुदलातील हवाई कसरतीसाठी प्रसिद्ध असलेली हेलिकॉप्टरची सारंग टीम आणि त्याचबरोबर सूर्यकिरण ही विमानांची प्रात्यक्षिके सादर करणारी टीम यांनी चित्त थरारक कवायती करून मुंबईकरांना एक सुखद धक्का दिला. लहान ते थोरांपासून तसेच आजी-आजोबांपासून सर्व स्तरातील हजारो मुंबईकर यांनी मरीन ड्राईव्ह परिसरात हा शो पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती.

सारंग हेलिकॉप्टरची विशेष भूमिका:'सारंग' या हेलिकॉप्टर बाबत सांगायचं झालं तर हे जगामध्ये हवाई कसरतीसाठी प्रख्यात असून भारतीय बनावटीचे ध्रुव हेलिकॉप्टर आहेत. याच्या कसरतीमध्ये हवेत सूर मारणे, विविध रंग हवेमध्ये उधळत कसरती करणे या सारंग हेलिकॉप्टरच्या टीमची क्षमता आहे. मुंबईत हवाई कसरतीमध्ये चार सारंग हेलिकॉप्टरचा समावेश झाला होता. तर सूर्यकिरण ही ब्रिटनचे तंत्रज्ञान असलेले खास करून वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात येणारी HAWK जातीची विमाने आहेत. या विमानांनी १९९६ पासून जगभरात हवाई कसरती करून वाहवा मिळवली आहे. आजसुद्धा या विमानांनी चित्तथरारक कसरती करून मुंबईकरांची वाहवा मिळवली. मुंबईकरांनीसुद्धा या चित्त थरारक प्रात्यक्षिकांना भरपूर दाद दिली.

संरक्षण दलाबद्दल ओढ: 'सुखोई ३० एमकेआय' विमानाने तासाला २ हजार किलोमीटरच्या वेगाने प्रवास करून पुण्याच्या लोहगाव हवाई तळावरून अलिबाग मार्गे ३ मिनिटात मरीन ड्राईव्ह गाठून अवकाशात १० मिनटे डोळ्याची पारणे फेडणारी चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली. नागरिकांमध्ये संरक्षण दलाबद्दल ओढ वाढावी त्याचबरोबर अधिकाधिक लोक संरक्षण दलाच्या सेवेत दाखल व्हावेत, या उद्देशाने मरीन ड्राईव्ह येथे भारतीय हवाई दलातर्फे चित्तथरारक कसरतीचे आयोजन करण्यात आले होते.


मुंबईकरांनी अनुभवला अद्‌भूत करिष्मा:हा एअर शो पाहण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हजारो मुंबईकर मरीन ड्राईव्ह येथे दाखल झाले होते. या शोबद्दल बोलताना मुंबईकर भगिनींनी सांगितलं आहे की, जबरदस्त असा हा एअर शो आहे. हा एअर शो बघण्यासाठी मी दोन किलोमीटरच अंतर पायी चालून येथे पोहोचले आहे. शो पाहण्यासाठी मी फार उत्साहित होते. दुसऱ्या एका मुंबईकर भगिनींनी सांगितले आहे की, हा आमच्यासाठीच नाही तर लहान मुलांसाठीसुद्धा फार सुंदर असा शो आहे. मुलांनासुद्धा हवाई दलाबाबत माहिती भेटावी, एअरक्राफ्ट कुठले कुठले आहे, ते कशा पद्धतीनं काम करतात यासाठीसुद्धा फार उपयुक्त असा हा एअर शो असून संपूर्ण मुंबईकर इथे एकवटले आहेत.

हवाई दलाची ताकद कळून आली:एका मुंबईकराने सांगितले की, हा फार सुंदर असा अद्‌भूत एअर शो असून यासाठी वैमानिकांनी बऱ्याच दिवसांपासून याची रंगीत तालीम केली आहे. विशेष म्हणजे, यामुळे आपल्या हवाई दलाची ताकद समजून येते. त्याचबरोबर महिला वैमानिकांचंसुद्धा विशेष आभार मानायला पाहिजे. महिला वैमानिकांचा यामध्ये असलेला सहभागसुद्धा लाखमोलाचा असून भारतीय हवाई दलाचा आम्हाला गर्व आहे, असेही मुंबईकरांनी सांगितलं आहे.

प्रेक्षकांची तुफान गर्दी :शनिवारी दुपारी हवाई दलाच्या मार्फत करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांना मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र या प्रात्यक्षिकांमुळे रविवारी गर्दीत दुपटीने वाढ झाली. सुट्टीचा दिवस असल्यामुळे अतिशय दूर अंतरावरून लोक नरिमन पॉईंटच्या दिशेने येत होते. बारा वाजण्याच्या सुमारास नरिमन पॉईंट सह गिरगांव पर्यंतच्या दक्षिण मुंबईच्या किनाऱ्यावर लोकांचा जनसागर लोटला. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी आबाल वृद्धांसह हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.


रेल्वे स्थानकांवर तुफान गर्दी:हवाई प्रात्यक्षिकांचा शो संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे दक्षिण मुंबईतील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. वाहनांचा कर्णकर्कश आवाज आणि त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेली पोलिसांची धावपळ असे चित्र सर्वत्र दिसत होते. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि चर्चगेट या उपनगरीय लोकल रेल्वे सेवेच्या स्थानकांवर तर पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हती. रेल्वे स्थानकात घुसण्यासाठीसुद्धा जागा मिळत नसल्याने अनेक प्रेक्षकांनी प्लॅटफॉर्मच्या शेजारी लावलेल्या जाळ्या आणि पत्रांमधून स्वतः रेल्वे स्थानकात घुसण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तास रेल्वे स्थानकावर हा गोंधळ सुरू होता.

हेही वाचा:

  1. उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे इटालियन काँग्रेसला मत देणं- चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल
  2. दक्षिण मुंबईची जागा आमचीच, नवीन परंपरेनुसार मिलिंद देवरांनी पक्ष बदलला - संजय राऊत
  3. मिलिंद देवरांच्या राजीनाम्याबाबत काँग्रेसचा थेट पंतप्रधान मोदींवर आरोप, 'हा' केला मोठा दावा
Last Updated : Jan 14, 2024, 5:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details