मुंबई- बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू यांच्यासह मधु वर्मा मंटेना, विक्रमादित्या मंटेना आणि विकास बहल यांच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. या कारवाईनंतरही आयकर विभागाकडून अद्याप तपास सुरूच आहे. मुंबई, हैदराबाद, दिल्ली पुणे या शहरातील तब्बल 28 ठिकाणी मारण्यात आलेल्या छापेमारीनंतरची कारवाई अजूनही सुरू आहे. यामध्ये जवळपास 650 कोटी रुपयांच्या रकमेची चौकशी आयकर विभागाकडून केली जात आहे.
तापसी पन्नूला १२ प्रोजक्टमधून मिळाली मोठी रक्कम-
सिनेकलाकारांच्या मालमत्तांवर 3 मार्चला सुरू करण्यात आलेली ही छापेमारी तिसऱ्या दिवशी (5 फेब्रुवारी) सुद्धा सुरूच असल्याचे आयकर सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तापसी पन्नू हिच्या घरातून 5 कोटी रुपयांची कॅश रिसिप्ट मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तापसी पन्नू सध्या 12 प्रोजेक्ट मध्ये काम करत असून यासंदर्भात तिला मोठी रक्कम मिळालेली आहे. मात्र या संदर्भातील कर भरणा हा नियमितपणे भरण्यात आला नसल्याचंही त्यांचे म्हणणे आहे.