मुंबई- येथील अबुल हसन खान यांच्या पाच कंपन्या आणि चांदिवली येथील निवडणूक प्रचार कार्यालयावर आज आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. खान हे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे या परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची धास्ती सत्ताधारी भाजपाने घेतली आहे. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य केले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.
चांदिवलीतील वंचित उमेदवाराच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड हेही वाचा-ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन
आमच्या उमेदवाराने सर्व प्रकारचे कर भरले आहे. त्यासाठीची कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. मात्र, असे असताना आज आयकर विभागाकडून धाडी टाकून दबावतंत्र केले जात आहे. त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे ठाकूर म्हणाल्या. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची सर्व प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आयकर विभागाने अशाप्रकारे उमेदवारांच्या कार्यालयावर आणि त्यांच्या कंपन्यावर धाडी टाकणे चुकीचे आहे. त्यासाठी त्यांनी संबंधित रिटर्ननिंग ऑफीसरची कोणतीही परवानगी घेतली नाही, असा दावा ठाकूर यांनी केला.
हेही वाचा-नोबेल २०१९ : जॉन बी. गुडइनफ एम. स्टॅनली व्हिटिंगहम अन् अकिरो योशिनो ठरले रसायनशास्त्रातील नोबेलचे पारितोषिक विजेते!
वंचितचे सरचिटणीस व नेते डॉ. ए.डी. सावंत म्हणाले की, आमच्या उमेदवाराने सर्व प्रकारचा कर भरला आहे. त्याची कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत. अशा स्थितीमध्ये आयकरने धाडी टाकून पुन्हा एकदा वंचितला रोखण्याचा प्रयत्न सरकारच्या दबावाच्या माध्यमातून केला जात असल्याचा आरोप डॉ. सावंत यांनी केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांनी आपण सर्व प्रकारचा कर भरला असल्याचे सांगत आपल्यावर टाकण्यात आलेल्या धाडी या केवळ दबावाचा भाग असल्याचा दावा केला. त्यांना यापूर्वी आयकर विभागाकडून कोणतीही नोटीस आली नाही. मात्र, आता मी निवडणुकीच्या मैदानात उभा असल्याने आपल्यावर दबावाचे राजकारण केले जात असल्याचा दावाही खान यांनी माध्यमांशी बोलताना केला.