मुंबई : ठाकरे कुटुंबाचे एक रुपयाचे उत्पन्न नसताना त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून? असा घणाघात भाजप आमदार, नितेश राणे यांनी केला आहे. ठाकरे कुटुंबाला सर्व गोष्टी पुरवल्या जात आहेत. परंतु त्यांचे स्वतःचे काहीच उत्पन्न नाही. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेली गाडी सुद्धा विदर्भातील एका आमदाराच्या नावावर आहे, असा आरोपही नितेश राणे यांनी केला आहे. ते मुंबईतील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.
ठाकरे कुटुंबाकडे पैसा येतो कुठून? : ठाकरे यांच्या घरी एक तरी गोष्ट स्वतःच्या खर्चाने होत आहे का? त्यांच्या घरी एसी कुठल्या कंपनीचे आहेत. व्हिडिओकॉन कंपनीचे मालक कोणाचे खासदार होते? यांचे सर्व कपडे धुण्यासाठी लीला हॉटेलमध्ये जातात, कारण तेथे भारतीय कामगार सेनेची युनियन आहे. यांचे बाहेरचे परदेशी दौरे असतात त्यासाठी सुद्धा एक रुपया त्यांच्या खिशातून जात नाही. मोठ-मोठे उद्योगपती त्यांचा सर्व खर्च उचलतात. तिथून यांना परफ्युम पोहोचवले जातात. यापेक्षा जास्त माहिती किरण पावसकर देतील. घर स्वतःच नाही. गाड्या स्वतःच्या नाहीत. परफ्युम स्वतःचा नाही. मातोश्री २ साठी खर्च केला आहे, तो कुठून आणला? त्याचा सर्व तपशील नावा, बिलासहीत मी देऊ शकतो, असेही नितेश राणे म्हणाले आहेत.
'महाविकास आघाडीची सत्ता असताना मोठ्या प्रमाणात वसुली केली गेली. लोकांकडून खंडणी घेतली म्हणून त्यांच्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावे लागले. पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कराव्या लागल्या. तत्कालीन मुख्यमंत्री, त्यांच्या कुटुंबीयांवर सुद्धा खंडणीचे आरोप झाले. उद्धव ठाकरेंनी आपल्या आयुष्यात हेच केले आहे. स्वतःचे एका रुपयाचे उत्पन्न नसतानाही आलिशान आयुष्य उद्धवजी, त्यांचे कुटुंब जगत आहेत, ते कशामुळे आहे.'-आमदार नितेश राणे
आरोपांमध्ये तथ्य आहे :ठाकरे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी उपनेत्या सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला आहे. सुषमा अंधारे पक्षामध्ये दमदाटी करतात, सतत पैसे मागतात असेही त्यांनी म्हटले आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, कुठल्याही महिलेच्या मारहाणीचे आम्ही समर्थन करत नाही. आमच्यावर तसे संस्कार आहेत. कुठलीही महिला असेल, भगिनी असेल कोणीही तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहता कामा नये. सुषमाताईंनी आमच्यावर कितीही खालच्या पातळीवर टीका केली तरी महिला म्हणून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. पण जिल्हाप्रमुखांनी जे काही आरोप केले आहे ते आरोप फार महत्त्वाचे आहेत.