मुंबई - सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होणाऱ्या गावात सध्या दुष्काळ पडला आहे. त्यामुळे येथील आझाद मैदानात सध्या लहान मुलांचे पाण्यासाठी अनोखे आंदोलन सुरू आहे. हे विद्यार्थी पाण्याच्या मागणीसाठी शाळा सोडून आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे 'भजन कीर्तन' करत सरकारला आपल्या जिल्ह्याला पाणी द्या, अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत.
पाण्यासाठी सांगलीतील विद्यार्थ्यांचे मुंबईत 'भजन-किर्तन' आंदोलन जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याबाबत सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार केला गेला. पण, सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे, सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेंतर्गत येणाऱ्या गावातील लहान मुले आणि त्यांचे पालक आंदोलन करत आहेत. गावात पाणी नाही त्यामुळे, मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. सरकारने शेजारी असलेल्या तलावांमधून आमच्या गावांची पाण्याची सोय करावी, अशी मागणी करत मुले शाळा बुडवून मुंबईतील आझाद मैदानात पारंपरिक 'भजन कीर्तन' करत सरकारला पाणी द्या तरच जाऊ, असे सांगत आहेत.
'भजन-किर्तन' आंदोलन करताना विद्यार्थी मायकल कॅनॉलपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या व्यासपीठ तलावात कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात यावे. त्यामुळे शेजारील सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. व्यासपीठ तलाव ते गुड्डापूर तलाव फक्त अडीच किलोमीटर कॅनॉलचे काम केल्यास गुड्डापूर तलावातील पाण्याचा उपयोग आसंगी, गोंधळवाडी, संघ, भिवर्गी व ओढा पात्र पाण्यात जाऊन सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. त्यामुळे तशी उपाययोजना करावी.
तसेच कर्नाटकातील कनमडी तलावातून सिद्धनाथ तलावापर्यंत कॅनॉलद्वारे पाणी पोहोचवल्यास आसंगी, मोठेवाडी, कागनगरी पांडोझरी, पारधी, करेवाडी या गावांनाही ओढा पात्रातून पाणी जाऊ शकेल. मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. पण, पिण्यास पाणी नसल्यामुळे मुले शाळेत तरी कसे जाऊ शकतात? त्यामुळे आधी पाणी द्या, नंतरच शाळेत जाऊ अशी, मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली आहे.
पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू झालेली आहे. सांगली जिल्ह्यातील हे विद्यार्थी आपली शाळा बुडवून आजाद मैदान येथे पाण्याच्या प्रश्नासाठी आलेले आहेत. त्यामुळे आता सरकार या लहान मुलांच्या आंदोलनाकडे कसे बघते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.