मुंबई :जम्बो कोविड सेंटर आर्थिक घोटाळा प्रकरणात आज पीएमएलए न्यायालयात आरोपी क्रमांक एक सुजित पाटकर आणि आरोपी क्रमांक दोन डॉ. किशोर बिसुरे यांना हजर केले गेले. आजच्या सुनावणीमध्ये सुजित पाटकर यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. पाटकर यांना विनाकारण राजकीय हेतूने अडकवले जात आहे. हे प्रकरण रंगवले जात आहे, असा युक्तिवाद केला. तर ईडीच्या वकिलांनी मागील 7 दिवसात पाटकर यांची चौकशी केली आणि त्याचा अहवाल न्यायालयात लेखी स्वरूपात सादर केला.
डॉ. बिसुरे यांना औषध, चष्मा वापरण्याची अनुमती :अहवालात सुजित पाटकर यांनी कबूल केले की, एका राजकीय नेत्याच्या प्रभावामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कोरोना महामारीच्या काळातील जम्बो कोविड सेंटरचे काम मिळाले होते. ज्या राजकीय नेत्याच्या प्रभावाने हे काम मिळाले त्याबाबतची लिखित माहिती त्या अहवालात नोंदवली असल्याचे ईडीच्या वकिलाने त्यात स्पष्ट केले. दोन्ही पक्षकारांचे मुद्दे ऐकल्यानंतर न्यायाधीश एमजी देशपांडे यांनी दोन्ही आरोपींना विचारले की, कोणताही त्रास ईडीकडून तुम्हाला दिला गेला किंवा काय? त्यावर दोन्ही आरोपींनी, नाही असे उत्तर दिले. तर डॉ. किशोर बिसुरे यांनी त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे कारागृहात औषध आणि चष्मा हे मला जवळ बाळगता यावा यासाठी कोर्टाला लेखी विनंती देखील केली होती. त्यानंतर कोर्टाने ती विनंती मान्य करत तुरुंग अधीक्षक यांनी डॉ. किशोर बिसुरे हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांच्याजवळ असलेले औषध तपासणी करण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत अखेर तुरुंगात औषध, चष्मा बाळगण्यासाठी अनुमती दिली.
महाराष्ट्र शासन व पोलिसांना नोटीस:मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुजित पाटकर यांनी त्यांच्यावरील पुणे आणि मुंबई येथे दोन्ही दाखल केलेल्या प्रथम खबरी अहवालातील मुद्दे एकसारखेच आहेत. त्यामुळे एफआयआर रद्द करावा. तसेच राजकीय हेतूने हा आरोप केला गेलेला आहे. हे आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केले. त्यानंतर राजकीय हेतूने हा खटला दाखल केल्याचे त्यांनी त्यात म्हटलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील दाखल एफआयआर रद्द करावा, ह्या स्वतंत्र याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि आर एन लड्डा यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र शासन, मुंबई आणि पुणे पोलिसांना आणि किरीट सोमैया यांना देखील नोटीस बजावलेली आहे. त्यात प्रतिवादींनी आपले उत्तर दाखल करावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.