महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत काल सकाळी ६ वाजेपर्यंत ६६ हजार २०९ गौरी गणपतींचे विसर्जन - गणेशोत्सव 2021

मुंबईत बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पाचव्या दिवसाचा गणपती आणि गौरींचे विसर्जन झाले. सकाळी ६ वाजेपर्यंत ६६ हजार २०९ गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ३४ हजार २०९ गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले.

मुंबई
मुंबई

By

Published : Sep 16, 2021, 12:03 PM IST

मुंबई : गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मंगळवारी (14 सप्टेंबर) पाच दिवसांचा गणपती बाप्पा आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले. बुधवारी (15 सप्टेंबर) सकाळी ६ वाजेपर्यंत हे विसर्जन सुरू होते. सकाळी ६ वाजेपर्यंत ६६ हजार २०९ गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ३४ हजार २०९ गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. कृत्रिम तलावाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला. ५० टक्क्यांहून अधिक विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

निर्बंध पाळून विसर्जन -

मुंबईमध्ये घरगुती आणि सार्वजनिक अशा जवळपास २ लाख मुर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. या मुर्ती दीड, पाच, सात आणि दहाव्या दिवशी विसर्जन केल्या जातात. मुंबईत गेले दीड वर्षे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने निर्बंध लागू आहेत. या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यासाठी महापालिका प्रशासनाने नैसर्गिक आणि कृत्रिम तलावाच्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भाविक विसर्जनासाठी थेट समुद्र, तलाव आदी ठिकाणी पाण्यात जाणार नाही याची काळजी घेण्यात आली. पालिका कर्मचाऱ्यांनी भाविकांकडून मुर्ती आपल्या ताब्यात घेऊन नैसर्गिक व कृत्रिम तलावात विसर्जन केले.

६६ हजार २०९ मूर्तींचे विसर्जन -

मंगळवारी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास गणेश व गौरी मूर्त्यांचे विसर्जन करण्यास सुरुवात झाली. बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ६६ हजार २०९ गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ११९३ सार्वजनिक, ५९ हजार १५३ घरगुती आणि ५९५३ गौरींचे विसर्जन करण्यात आले. एकूण ६६ हजार २०९ विसर्जन करण्यात आलेल्या मूर्तींपैकी ३४ हजार २९९ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावात सार्वजनिक ६५८, घरगुती ३०,६३६ तर ३००५ गौरींचा समावेश आहे.

७३ नैसर्गिक व १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव -

मुंबई शहरात गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकार आणि पालिकेने निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार भाविकांनी विसर्जनस्थळी गणेश मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यास सांगण्यात येत होते. पालिका कर्मचारी गणेश मूर्तींचे विसर्जन करत आहेत. मुंबईत एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध होता. तसेच सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

गणेश आरती घरीच करण्याचे आवाहन
मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

...तर साथरोग कायद्यानुसार कारवाई -

कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे नियम पाळून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गणेशोत्सवादरम्यान गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी पालिकेने नियमावली तयार केली आहे. मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी घालून दिलेल्‍या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍यात यावे. उत्सव प्रसंगी कोरोना विषाणूचा फैलाव होईल, अशी कोणतीही कृती करू नये. अन्यथा, अशा व्यक्ती साथरोग कायदा १८९७, अंतर्गत कारवाईस पात्र ठरेल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

निर्विघ्न विसर्जन व्हावं हाच प्रयत्न -

नागपूर खंडपीठाने नैसर्गिक ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन करू नये, असे आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन केले जाईल. बाप्पाचे निर्विघ्न विसर्जन व्हावं हाच आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुंबईमधील विसर्जन स्थळांची संख्या वाढवण्यात येईल. सोसायट्यांमध्ये विसर्जनाची व्यवस्था केली जाईल. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. पालिका प्रशासनाचे कर्मचारी विसर्जनासाठी येणाऱ्या मूर्ती चौपाटीबाहेरच स्वत:कडे घेऊन विसर्जीत करतील. त्यासाठी महापालिकेची तयारी पूर्ण आहे. बाप्पाबद्दलच्या संवेदना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेऊ. गणेश विसर्जनाला मुंबईकर आले तर निर्विघ्न विसर्जन व्हावं हाच प्रयत्न असल्याचे महापौरांनी सांगितले. विसर्जनावेळी नागरिकांनी गर्दी करू नयेत, यासाठी कृत्रीम तलावांची संख्या वाढवणार आहे, असे महापौरांनी सांगितले.

हेही वाचा - वर्धा नदी बोट दुर्घटना, 11 पैकी 10 जणांचे मृतदेह सापडले

हेही वाचा -सोनू सूदच्या घरी 20 तास इनकम टॅक्सची झाडाझडती

ABOUT THE AUTHOR

...view details