मुंबई - निसर्ग चक्रीवादळ हे सध्या मुंबईपासून १९० तर अलिबागपासून १४० किलोमीटर अंतरावरावर असून, ते रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या दिशेने येत आहे. रौद्ररुप घेतलेले हे चक्रीवादळ दुपारी १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान अलिबागच्या दक्षिण दिशेला धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भूते यांनी दिली. दरम्यान, यावेळी वाऱ्यांचा वेग १०० ते ११० असण्याची शक्यता आहे. तसेच मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.
सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे निसर्ग हे चक्रीवादळ कोकण किनापट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे मुंबई, ठाणेसह कोकण किनारपट्टीवर एनडीआरएफच्या २० तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण किनारपट्टीवर राहणाऱ्या सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. सर्व मच्छीमार सुखरुप आपापल्या घरी परतले आहेत. लोकांनी दोन दिवस घरातून बाहेर पडू नये. चक्रीवादळ असल्याने उघड्यावर कोणतेही महत्त्वाचे साहित्य ठेवू नये, घराबाहेर कोणीच पडू नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले होते.