मुंबई -शहर विद्रूप करण्यात राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. पालिकेने वर्षभरात बॅनरवर केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहता शहर विद्रूप करण्यात राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. वर्षभरात ११ हजार २०२ होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ६ हजार ५३५ होर्डिंग्ज हे राजकीय पक्षांचे असल्याचे समोर आले आहे.
शहरात मोकळ्या जागा व्यापल्या असताना त्यात आता विविध प्रकारची होर्डिंग लावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मुंबईत अनधिकृतपणे होर्डिंग लावण्यावर निर्बंध आहेत. राजकीय पुढाऱ्यांचे वाढदिवस, सभा, मोर्चे, आदी कार्यक्रमांच्या जाहिरातींचा या अनधिकृत होर्डिंग्जमध्ये भर पडली आहे. यातील बहुतांशी होर्डिंग्ज अनधिकृत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे नोंद आहेत. या तक्रारीनंतर पालिकेकडून असे होर्डिंग्ज काढले जातात, तरीही नियम धाब्यावर बसवून भले मोठे होर्डिंग लटकवून शहर विद्रूप केले जाते. विशेष म्हणजे कारवाई करण्यात येणाऱ्या होर्डिंग्जमध्ये राजकीय पुढाऱ्यांचीच सर्वाधिक होर्डिंग आहेत. पालिकेने जानेवारी २०१८ ते २०१९ या वर्षभरातील कारवाईचा अहवाल नुकताच आयुक्तांना सादर केला.
त्यानुसार मुंबईतून ११ हजार २०२ होर्डिंग काढण्यात आले. यात ६५२५ राजकीय, १८७५ व्यावसायिक तर २७९२ हे इतर बॅनर होते. महापालिकेने याबाबत २२९५ जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार तर ६४० जणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. जानेवारी २०१९ या एका महिन्यात केलेल्या कारवाईत १२५५ बॅनरपैकी ६३२ हे राजकीय पक्ष आणि नेत्यांचे असल्याचे समोर आले आहे. यामध्ये दक्षिण विभागात सर्वाधिक २७६ होर्डिंग काढली असून १२० होर्डिंग्ज ही राजकीत पक्ष आणि नेत्यांची होती.