मुंबई :आयआयटीमध्ये गुजरातचा विद्यार्थी दर्शन सोळंकीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आयआयटीच्या एका विद्यार्थ्याला अटक केली आहे. आरोपी हा विद्यार्थी दर्शन सोळंकी याचा बॅचमेट असून, तो त्याच्यासोबत एकाच वसतिगृहात राहत होता. सोळंकी ज्या आयआयटीच्या वसतिगृहात राहत होता, त्याच मजल्यावर अरमान खत्री राहतो. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी ३ मार्च रोजी एक कथित सुसाईड नोट जप्त केली होती, ज्यामध्ये अरमानने माझी हत्या केल्याचे म्हटले होते. त्याच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. अरमानला न्यायालयात हजर केले असता 13 एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मृत्यूला जातीभेद कारणीभूत :मागच्या आठवड्यात एका हस्ततक्षर तज्ज्ञाने सोळंकीच्या लिखाणाशी जुळणाऱ्या लिखाणाची पुष्टी केली होती. IIT मुंबईत शिकणाऱ्या दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने १२ फेब्रुवारीला वसतिगृहाच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी दर्शनने सुसाईड नोट लिहिली होती. त्यावर त्याने अरमानचे नाव लिहिले होते. सुसाईड नोटमध्ये अरमानने त्याला त्रास दिल्याचा आरोप केला होता. तसेच तो सतत धमकवत असल्याचा आरोप दर्शनने नोटमध्ये केला होता. दर्शन सोळंकीच्या मृत्यूला जातिभेद कारणीभूत असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी विशेष तपास पथक एसआयटी स्थापन केली होती.
दर्शन सोळंकीच्या पालकांचा आरोप : मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात मृत दर्शन सोळंकीच्या पालकांनी लिहिले आहे की, आमचा अठरा वर्षांचा मुलगा दर्शन सोळंकीचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात, 16 मार्च 2023 रोजी मुंबईत एफआयआर नोंदवण्यासाठी आम्ही पवई पोलीस ठाण्यात गेलो होतो. मात्र, पोलिसांनी आमची तक्रार नोंदवली नाही. आम्ही पोलिसांना एफआयआर नोंदवण्याची विनंती केली होती. पण त्यांनी आमची तक्रार नोंदवण्यास नकार दिला होता, असा आरोप सोलंकीच्या पालकांनी केला आहे.
जातीवादाचा आरोप - विशेष तपास पथकामार्फत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. विशेष पथकाचा तपास सुरू असताना अशी तक्रार नोंदवता येणार नसल्याचे कारण पोलिसांनी आम्हाला दिल्याचे सोळंकी यांच्या पालकांनी सांगितले. पालकांनी सांगितले की, पोलिसांनी आम्हाला सांगितले की तुमची तक्रार आवश्यक कारवाईसाठी पाठवली जाईल. दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने आयआयटी मुंबईच्या वसतिगृहाच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. जातिभेदामुळे दर्शनने आत्महत्या केल्याचा दावा दर्शनचे कुटुंबीयांनी केला आहे. तसेच आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी देखील जातीय भेदातून आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. विविध संघटनांनी सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना करुन तपास करण्याची मागणी केली होती.
हेही वाचा - Minor Girl Raped: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून 'प्रायव्हेट पार्ट'मध्ये टाकली माती, आरोपीला अटक