मुंबई IIT Bombay Tech Fest 2023 : भारत महासत्ता देश बनण्याच्या तयारीला लागला आहे. मात्र भारताकडं उपग्रहांचा पुरेसा ताफा नाही. त्यासाठी आगामी पाच वर्षात गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी इस्रो 50 उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याचं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी स्पष्ट केलं. भारतीय सीमेवर सैन्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी उपग्रहांचं जाळ हवं आहे. मात्र सध्या उपग्रहांची संख्या कमी आहे. ती आजच्या तुलनेत दहापट असावी, असंही एस सोमनाथ यांनी यावेळी स्पष्ट केलं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेच्या ( IIT Bombay ) वार्षिक विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रम 'टेकफेस्ट' या कार्यक्रमात एस. सोमनाथ बोलत होते.
इस्रो करणार 50 उपग्रहांचं प्रक्षेपण :भारतात सध्या असलेल्या उपग्रहांची संख्या कमी आहे. त्यामुळं शेजारच्या देशाच्या सीमा आणि सैन्याची हालचाल यांची माहिती मिळवण्यासाठी उपग्रह महत्वाची भूमिका बजावतात. आजुबाजूला काय घडते, हे समजून घेण्याच्या क्षमतेवरुन राष्ट्राची शक्ती सिद्ध होत असते. त्यामुळं बदल शोधण्यासाठी उपग्रहांची क्षमता सुधारणं, डेटाचं विश्लेषण करणं, आवश्यक माहिती मिळवणं, यासाठी उपग्रहांची गरज आहे. त्यामुळं इस्रो आगामी पाच वर्षात 50 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, असं एस सोमनाथ यांनी यावेळी नमूद केलं.
देशासमोरचे धोके ओळखता येतात :गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी उपग्रहांची मोलाची मदत होते. सीमेवर हालचाल होत असल्याचं उपग्रहांच्या माध्यमातून टिपता येतं. त्यामुळं देशासमोर असलेले धोके ओळखता येतात. चांगल्या प्रकारचे उपग्रह तयार केल्यास हे धोके कमी होतील, असं इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी स्पष्ट केलं. इस्रो भूस्थिर विषुववृत्तीय कक्षापासून ( GEO ) लोअर अर्थ ऑर्बिटपर्यंत ( LEO ) उपग्रहांचं जाळ तयार करता येऊ शकतं, असंही एस. सोमनाथ यांनी यावेळी स्पष्ट केलं.
आताच्या दहापट असावी उपग्रहांची संख्या :इस्रो आगामी पाच वर्षात नवीन 50 उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी नवीन डोमेन केवळ ऑप्टिकलमध्येच नाही, तर सिंथेटिक अॅपर्चर रडार ( SRA ) आणि थर्मलमध्येही येईल, असंही एस. सोमनाथ यांनी स्पष्ट केलं. या नवीन तंत्रज्ञानामुळं तुम्हाला सीमेवर लहानात लहान गोष्टींकडंही पाहता येऊ शकतं, असं सोमनाथ म्हणाले. सध्या भारताकडं केवळ 54 उपग्रहांची संख्या आहे. मात्र उपग्रहांची ही संख्या पुरेशी नाही. आताच्या संख्येपेक्षा दहापट संख्या भारताकडं असायला हवी, असंही एस. सोमनाथ यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
- चंद्रयानाच्या यशानंतर आता इस्रोला जायचंय अंतराळात, पुढील लक्ष्य गगनयान!
- ISRO Gaganyaan Program : इस्रोचं ठरलं! गगनयान मोहिमेसाठी पहिलं उड्डाण 'या' दिवशी