मुंबई- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने मरिन ड्राइव्ह येथील इस्लाम जिमखाना येथे रोझा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मुस्लीम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
मुंबईत काँग्रेसकडून इफ्तार पार्टीचे आयोजन; दिग्गज नेत्यांची उपस्थिती रमजानच्या पवित्र महिन्यात विचारांनी देशाला अधिक मजबूत करण्यासाठी मुस्लीम बांधवांचे योगदान मोठे आहे. मुस्लीम समाज हा धर्मनिरपेक्ष असल्याचे त्यांनी निवडणुकीत दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात देशात बदल घडेल, अशी प्रतिक्रियाही अशोक चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.
दिवंगत मुरली मनोहर देवरा हे मुंबईचे अध्यक्ष असताना त्यांनी मुंबई व महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले, ही परंपरा मिलिंदही पुढे चालवतील, असेही चव्हाण यावेळी म्हणाले. या पार्टीला सिने अभिनेत्री व काँग्रेसची उत्तर मुंबईची उमेदवार उर्मिला मातोंडकर हिनेदेखील पती मोहसीन अखतर मीरसोबत हजेरी लावली. सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत असल्याचा अभिमान असल्याचे उर्मिलाने सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे आमदार भाई जगताप, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, खासदार हुसेन दलवाई, आमदार अमीन पटेल, आमदार नसीम खान, टिपू सुलतान फेम संजय खान या आदी पार्टीला उपस्थित होते.