मुंबई Ashwini Bhide on British Airways : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून प्रवास करताना वाईट अनुभव आलाय. त्यांनी याबद्दल 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनुभव शेअर केलाय. तसंच त्यांनी ब्रिटिश एअरवेजची तक्रारही केली आहे. ब्रिटिश एअरवेजनं ओव्हरबुकिंगचं कारण देत प्रीमियम क्लासचं सीट बुक असतानाही भिडे यांना इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करण्यास लावलं होतं. त्यामुळं भिडे यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी 'X' साईटवर पोस्टमध्ये त्यांना झालेल्या त्रासाबद्दल लिहिलंय. ब्रिटिश एअरवेजच्या प्रवाशांना नेहमीच असे अनुभव येत असल्याचा दावाही भिडे यांनी पोस्टमध्ये केलाय. त्यावर ब्रिटिश एअरवेजकडून उत्तर आलंय. तुमच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असा रिप्लाय ब्रिटिश एअरवेजने भिडेंना दिलाय.
ब्रिटिश एअरवेजवर भेदभावाचा आरोप : अश्विनी भिडे यांच्याकडं प्रीमियम दर्जाचं तिकीट होतं. परंतु, ब्रिटिश एअरवेजनं अश्विनी भिडे यांना ओव्हरबुकिंगचं कारण देत इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करण्यास भाग पाडलं. त्यामुळं भिडे यांनी ब्रिटिश एअरवेजवर भेदभाव तसंच वर्णद्वेषाचा आरोप केलाय.