मुंबई- देशात आणि राज्यात आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असे मोठे विषय असताना सेना-भाजपचे लोक दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. शिवसेनेला निवडणुका आल्या की राम आठवतो. परंतु, या वेळी त्यांनी कितीही खोटेपणा केला तरी राज्यात सत्तापरिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अनुशक्तीनगर मतदार संघातील महा आघाडीचे उमेदवार नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा-ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन
मुंबईच्या विकासावर ते म्हणाले की, आम्ही मुंबईच्या विकासासाठी कायमच बोलत असतो. मुंबई चार वेळा पावसात का गेली. असा सवाल मी विचारला असता, मुंबई महापालिकेचे आयुक्त सांगतात, मुंबईची आर्थिक परिस्थितीही बरोबर नाही. काटकसरीचे धोरण आणले पाहिजे. मग मुंबई महापालिकेकडे येत असलेले 33 हजार कोटी रुपये जातात कुठे? त्यामुळे मुंबईतील सगळी नोकर भरती बंद करुन संपूर्ण महापालिका खासगीकरण करण्याचे कटकारस्थान या सरकारकडून केले जात आहे. बेस्टचे खासगीकरण करणे सुरु आहे. दुसरीकडे इलेक्ट्रिसिटी संपूर्ण अदानीला द्यायचे सुरू आहे. म्हणजे आतापर्यंत मुंबईला या लोकांनी पुन्हा लुटण्याचा कार्यक्रम शिवसेना-भाजपचा सुरू, असल्याचा आरोप मलिक यांनी केला.
हेही वाचा-नोबेल २०१९ : जॉन बी. गुडइनफ एम. स्टॅनली व्हिटिंगहम अन् अकिरो योशिनो ठरले रसायनशास्त्रातील नोबेलचे पारितोषिक विजेते!
अनुशक्तीनगर या माझ्या विधानसभा मतदारसंघात आम्ही सहा तारखेपासून पदयात्रेला सुरुवात केली. आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन मतदारांना भेटतोय, सरकारच्या विरोधात रोष निर्माण झालेला दिसत आहे. लोकांच्या समस्या सुटत नाहीत. सर्वसामान्य माणूस अडचणीत सापडलेला आहे आणि नेते मात्र मस्त आहेत. हे सर्व मला या प्रचारादरम्यान जाणवत असून यामुळेच राज्यात परिवर्तन होईल, असा विश्वास मलिक आज व्यक्त केला.
माझ्या मतदारसंघात असलेल्या झोपडपट्ट्या ह्या अनेक जुन्या असून त्या रेल्वेच्या जागेवर आहेत. त्या तोडण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, मी तो थांबवला. पुनर्वसन चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे, परंतु सध्याचे आमदार हे त्याबद्दल काहीच बोलत नाहीत. कुठेही लक्ष घालत नाहीत. त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या अडचणी ह्या कमी होण्याऐवजी त्या वाढतच चालल्या आहेत. इतकेच नाही तर या परिसरात राहणारे, इमारतींमध्ये राहणारे लोकही समाधानी नाहीत. त्यांच्या अडचणी तशाच आहेत. येथील लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये या विरोधात एक प्रकारे चीड निर्माण झाली असल्याचे मलिक म्हणाले.
शिवसेनेने आता दहा रुपयात जेवण देऊ यासाठीची घोषणा केली. त्यावर विचारले असता मलिक म्हणाले, यापूर्वी निर्माण केलेले झुणका-भाकर केंद्र आता कुठे आहेत? त्याच्या अगोदर त्यांनी माहिती द्यावी. आधीची सर्व झुणका भाकर केंद्र हे दारुचे दुकान झालेले आहेत. त्याठिकाणी 'चपटी', चायनीज विकले जाते. आता ही दारू विकण्याचे दुकान झाली आहेत. त्यामुळे आता नव्याने झुणका-भाकरच्या नावाने जागा हडपण्याचा नवा कार्यक्रम आहे. त्यामुळे जनतेला फायदा न देता जागा फुकट कशी हडप करायचे हा कार्यक्रम त्यांचा आहे.
राम मंदिर निर्माण करू, रामराज्य आणू, असे रामराज्य येत नाही, लोकांच्या जीवनात कुठेतरी बदल झाला पाहिजे. त्यांच्या जीवनात आनंदमय वातावरण निर्माण झाले पाहिजे.अशी परिस्थिती निर्माण होणे म्हणजे रामराज्य आहे. परंतु, यांना रामराज्याच्या नावाने केवळ राजकारण करायचं आहे. त्यातच राम मंदिराच्या संदर्भात जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तो निकाल सर्वांनीच मान्य केला पाहिजे. मात्र, हा विषय सुप्रीम कोर्टात असताना त्यासाठीचा भावनिक विषय घेऊन असं राजकारण करू नये असे मलिक म्हणाले.
अनुशक्तिनगर हा मतदारसंघ माझे कुटुंब आहे. या मतदारसंघांमध्ये ज्या काही मूलभूत सुविधा आहेत. त्या मी माझ्या कार्यकाळात 80 टक्के पूर्ण केल्या होत्या. ते काम मागील पाच वर्षात जसेच्या तसे पडून आहेत. येथील शताब्दी हॉस्पिटलला मेडिकल कॉलेज करण्याचा प्रस्ताव आम्ही तयार केला होता. त्यावेळी ५०० कोटी रुपये राज्य सरकारने देण्याचे मान्य केले होते. त्यानंतर महानगरपालिकेने सांगितले की, हे काम आम्ही करू. परंतु, त्यानंतर महापालिकेकडून एकही वीट याठिकाणी रचली गेली नाही. आयटीची फाईल होती ती मंत्रालयात तशीच पडून आहे. उलट सत्ताधारी लोक हे फुकट असलेली जमीन कशी आपल्या ताब्यात घेऊन त्यावर वास्तू बांधायची आणि ती ताब्यात घ्यायचा हेच कार्यक्रम या सरकारच्या नेत्यांचा असल्याने या मतदारसंघांमध्ये लोक त्रस्त झाले आहेत, असल्याचेही मलिक म्हणाले.