मुंबई - राज्यातील जनता केंद्र सरकारच्या कुटील कारस्थानाला बळी पडणार नाही. हिंमत असेल, तर भाजपने महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून दाखवावे, असे वक्तव्य कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून 'लिहून' घेतले आहे. शिवसेनेने जर उद्देशिकेबाहेर जाऊन काम केले, तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केले होते. किमान समान कार्यक्रमाला धरुनच आघाडीतील पक्ष सरकार चालवत आहेत. अशोक चव्हाणांच्या यांच्या वक्तव्यावर कोणीही नाराज नाही. त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले.