मुंबई- कॊरोना व्हायरसपासून दूर राहण्यासाठी वारंवार स्वच्छ हात धुणे वा हाताला सॅनिटायझर्स लावणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातूनच गेल्या महिन्याभरापासून सॅनिटायझर्सची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेत बाजारात बनावट सॅनिटायझर्स मोठ्या प्रमाणात विक्री साठी आणले जात आहेत. या बनावट सॅनिटायझर्सविरोधात एफडीए धडक कारवाई मोहीम उघडली आहे. त्यानुसार आतापर्यंत 52 धाडी टाकत 1 कोटी 74 लाखांचा बनावट सॅनिटायझर्सचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती विकास बियाणी, सहआयुक्त, मुख्यालय, एफडीएने दिली आहे.
'असे' ओळखा बनावट सॅनिटायझर्स - sanitizers demand
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझर्सची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेत बाजारात बनावट सॅनिटायझर्स विक्रीसाठी आणले जात आहेत. असे बनावट सॅनिटायझर्स आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. तेव्हा बनावट सॅनिटायझर्स कसे ओळखावेत याविषयी सांगताहेत विकास बियाणी, अन्न आणि औषध प्रशासनाचे (एफडीए) सह आयुक्त.
बनावट सॅनिटायझर्स वापरणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी बनावट सॅनिटायझर्सपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी सॅनिटायझर्स बनावट नाही ना हे तपासण्यासाठी सर्वात आधी लेबल तपासावे. त्यावररील उत्पादन तारखेपासून एक्सपायरीपर्यत सर्व बाबी तपासाव्या. त्यात अल्कोहोलचे प्रमाण किती आहे हे पाहावे. वासावरूनही बनावट सॅनिटायझर्स ओळखता येते. अल्कोहोलचे प्रमाण अधिक असल्यास त्याचा वास उग्र असतो. असा वास असल्यास सॅनिटायझर्स वापरण्यास योग्य असते. तर सॅनिटायझर्स हाताला लागल्यास ते काही सेकेंदात उडते. तर बनावट सॅनिटायझर्स हातावर बराच काळ राहते. तेव्हा योग्य सॅनिटायझर्स वापरा आणि कॊरोनाला दूर ठेवा असे आवाहनही बियाणी यांनी केले आहे.