मुंबई -कोरोनावर अजून औषध नसले तरी गंभीर रुग्णांसाठी रेमडेसीवीर आणि टॉसीलिझुमॅब इंजेक्शनचा वापर केला जात आहे. पण या औषधांचा तुडवडा असून काळाबाजार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एका औषध विक्रेत्याने सामाजिक भान जपत स्वस्तात ही औषधे विकण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार रेमडेसीवीर इंजेक्शन 5 हजार 400 रुपयांऐवजी 4 हजार रुपयांत तर टॉसीलिझुमॅब 40 हजार 545 रुपयांऐवजी 31 हजारात विकले जात आहे. रुग्ण आणि नातेवाईकांसाठी हा मोठा दिलासा ठरत असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
येथे मिळतील कोरोनावरील औषधे स्वस्तात.. औषध विक्रेत्यांचा पुढाकार
कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी रेमडेसीवीर आणि टॉसीलिझुमॅब इंजेक्शनचा वापर केला जात आहे. पण या औषधांचा तुडवडा असून काळाबाजार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एका औषध विक्रेत्याने सामाजिक भान जपत स्वस्तात ही औषधे विकण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार रेमडेसीवीर इंजेक्शन 5 हजार 400 रुपयांऐवजी 4 हजार रुपयांत तर टॉसीलिझुमॅब 40 हजार 545 रुपयांऐवजी 31 हजारात विकले जात आहे.
या दोन्ही इंजेक्शनचा वापर गेल्या महिन्याभरापासून वाढला आहे. कारण ही इंजेक्शन उपयोगी ठरत आहेत. मात्र, ही औषधे महागडी असून त्याचा पुरवठा कमी असल्याने त्याचा तुडवडा निर्माण झाला आहे. तर या औषधांचा काळाबाजार ही सुरू आहे. 5 हजार 400 रुपयांचे रेमडेसीवीर 30 ते 40 हजारात विकले जात आहे. एका रुग्णाला एकावेळी 6 इंजेक्शन लागत असल्याने गरजेला काळ्या बाजारातून दोन ते अडीच लाख रुपये केवळ औषधांवर खर्च करावे लागत आहेत.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेता ठाण्यातील ज्युपिटर फार्मसीचे मालक राजेश ठक्कर यांनी रुग्णांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी रेमडेसीवीर 5 हजार 400 रुपयांऐवजी 4 हजार तर टॉसीलिझुमॅब 40 हजार 545 रुपयांऐवजी 31 हजार विकण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या या संकटात आपण आपली जबाबदारी ओळखून काही तरी करायला हवे यातून हा निर्णय घेतल्याचे ठक्कर यांनी सांगितले आहे. तर याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचवेळी सिप्ला कंपनीने घाटकोपर येथील एसके एजेन्सी आणि भायखळ्यातील मसीना रुग्णालयातील फार्मसीमध्ये ही स्वस्तात ही दोन्ही इंजेक्शन उपलब्ध करून दिली आहेत.