मुंबई - लॉकडाऊनच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही विकृत प्रवृत्ती महिलांवर अत्याचार करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारींची अतिशय गंभीर दखल घेऊन अधिक कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. या काळात आपल्याला कोण अटकाव करणार? असा उद्दामपणा करीत महिलांवर अत्याचाराचे प्रकार होत आहेत. एकट्या स्त्रियांना त्रास देणे, त्यांचा विनयभंग करणे असे प्रकार जिथे घडतील तिथे कुठलाही मुलाहिजा न ठेवता अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.
''लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार" - women security issue maharashtra
महिलांना सन्मानाची वागणूक कशी मिळेल, हे पुरुष मंडळींनी बघावे. तसे न झाल्यास कायद्याचा बडगा उगारावाच लागेल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.
घरगुती हिंसाचाराच्या (डोमेस्टिक व्हायलन्स) घटनांचीही अतिशय गंभीर दखल घेतली जाईल. सध्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कुणीही स्त्रियांचा छळ केल्यास पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. तसेच शासन अशा पीडीत स्त्रियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
घरगुती वा अन्य कोणत्याही हिंसाचाराविरुद्ध महिलांना न्याय देणारा कायदा कठोर आहे आणि त्याची अंमलबजावणी तितक्याच कठोरपणे केली जाईल. महिलांना सन्मानाची वागणूक कशी मिळेल हे पुरुष मंडळींनी बघावे. तसे न झाल्यास कायद्याचा बडगा उगारावाच लागेल, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.