मुंबई - कपील वाधवान आणि कुटुंबीय यांच्या महाबळेश्वर प्रवासावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लक्ष करत जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अनिल देशमुख यांनी, वाधवान यांना परवानगी देणार अमिताभ गुप्ता हे आयएएस अधिकारी असून त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे सोमय्या यांनी केंद्राकडे तशी मागणी करावी, असे म्हटले आहे. तसेच किरीट सोमय्या ही उपद्रवी प्रवृत्तीची व्यक्ती आहे. त्यांच्या या स्वभावामुळेच त्यांना भारतीय जनता पक्षाने लोकसभेचे तिकीट नाकारून घरी बसवले होते असा टोलाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजप नेते सोमय्या यांना लगावला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा;भाजप नेते आक्रमक
राज्याकडून तातडीने कारवाई करण्यात आल्याची अनिल देशमुखांची माहिती...
लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबियांना खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्यासाठी पत्र देणारे गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी अमिताभ गुप्ता यांची चौकशी अर्थ विभागातील अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक या वरिष्ठ अधिकार्याकडून केली जाणार असल्याचे, देशमुख यांनी सांगतिले आहे. मात्र, कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला जर बडतर्फ करायचे असेल तर तो सर्वस्वी अधिकार केंद्राचा आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. तेव्हा किरीट सोमय्या यांनी भाजपच्या केंद्रातील मंत्र्यांना सांगितल्यास अमिताभ गुप्ता यांच्या विरोधात बडतर्फीची कारवाई केली जाऊ शकते. तशी मागणी त्यांनी केंद्राकडे करावी, असा सल्ला किरीट सोमय्या यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
काय आहे वाधवान प्रकरण ?
दिनांक 8 एप्रिल रोजी वाधवान कुटुंबियांना खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्यासाठी स्वतः गृह प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी पत्र दिले. यात कपिल वाधवान, अरुण वाधवान, वनिता वाधवान, टीना वाधवान, धीरज वाधवान, कार्तिक वाधवान, पूजा, युविका, आहान वाधवान यांसह त्यांच्या 14 कर्माचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. या पत्रात नमूद व्यक्ती हे माझ्या ओळखीचे असून यातील काही जण माझे कौटुंबिक मित्र असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी त्यांच्या पत्रात म्हटल्याची माहिती आहे.