मुंबई :लव्ह जिहादच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाने दादर शिवाजी पार्क ते कामगार मैदानापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढला. यावेळी हजारो मोर्चेकरी रस्त्यावर उतरले. भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केशव उपाध्ये, खासदार गोपाळ शेट्टी, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह शेकडो भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर, किरण पावसकर, शितल म्हात्रे यासह मोठ्या संख्येने महिला देखील मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
हिंदूंवर अत्याचार :गेल्या तीन वर्षांत हिंदूंवर अत्याचार होत आहे. हिंदूंची संख्या कमी होईल, असा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील हिंदूंना घरातून पलायन करावे लागले. आमच्या माता भगिनींचे लव्ह जिहादमधून आयुष्य खराब केले आहे. लव्ह जिहादद्वारे वर्चस्व निर्माण केले तर आम्ही खपवून घेणार नाही. आता महाराष्ट्रातील हिंदूंनी जागे होणे गरजेचे आहे. आमच्या विरोधात येणाऱ्यांविरोधात आम्ही लढू शकतो, हे सांगण्याची गरज आहे. हा मोर्चा त्यासाठीच आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात देखील हिंदूंच्या सणासुदींवर बंधने आणली गेल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला.
उद्धव ठाकरेंवर टीका : देशासह राज्यातील लव्ह जिहादच्या विरोधातील हा मोर्चा आहे. विधान परिषद आणि विधानसभेत लव्ह जिहादच्या कायद्यासह हे हिंदू राष्ट्र व्हावे अशी मागणी करणार आहोत. महिलांच्या हिताचा हा मोर्चा आहे, असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडले असून केवळ एमआयएमसोबत युती करण्याचे बाकी आहेत, अशी टीका लाड यांनी केली. शिवसेनेने हिंदुत्ववादाच्या विरोधात जाऊन ते राजकारण केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंवर केली.