मुंबई- राज्यातील विद्यापीठे आणि त्याअंतर्गत असलेल्या महाविद्यालयांमधील पदवी-पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येत्या काळात कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली.
अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी कायदेशीर सल्ला घेऊनच निर्णय घेऊ - उदय सामंत - university last year exam
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक व्हिडिओ जारी करून आपण अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय दोन दिवसात घेणार आहोत. मात्र, त्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊनच हा निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत एक महत्त्वाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली. या बैठकीमध्ये कुलगुरूंनी परीक्षा घेण्यासंदर्भात आपली भूमिका मांडली त्यावर मुख्यमंत्र्यांनी हा तिढा सोडवण्यासाठी विविध पर्यायांची पडताळणी करून त्यासाठीचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले. त्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक व्हिडिओ जारी करून आपण अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय दोन दिवसात घेणार आहोत. मात्र, त्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊनच हा निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
उदय सामंत म्हणाले की, अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात धोरण निश्चित करताना कुठेही कायद्याने काही त्रुटी राहू नये, त्यात काही कमी पडू नये याचा विचार आम्ही करतोय. यासाठी कायदेशीर सल्ला आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कुलगुरूंनीही परीक्षेच्या संदर्भात काय-काय उपाययोजना करता येतील या संदर्भातील आपली भूमिका मांडली. एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात येत्या दोन दिवसात निर्णय जाहीर केला जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.