रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील महानगरी टाईम्स' चे झुंजार पत्रकार शशिकांत वारीशे यांची भ्याड हत्या करण्यात आली. या प्रकरणी संशयित पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरीनाथ आंबेरकर याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्यातील पत्रकार संघटनांकडून लावून धरली. त्यानंतर आंबेरकर याला अटक करण्यात आली. राज्य शासनाने या घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. स्थानिक पोलीसांकडून तपास सुरू आहे.
शासनाकडून 25 लाखांच्या मदतीची घोषणा :पत्रकार शशिकांत वारीसे हे घरातील कर्तापुरुष होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, आई असा परिवार आहे. वारीसे यांच्या हत्येनंतर कुटुंबातील मुलगा आणि आईवर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून केली जात होती. रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली.