मुंबई- शहरामध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी या 'चायनामेड' विषाणूला पळवून लावण्यासाठी महापालिकेने आणि मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शहराच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. यावेळी मुंबई महापालिकेच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे महापौरांनी कौतुक करत आभारही मानले आहेत.
चीनच्या वुहान प्रांतामधून कोरोना विषाणू जगभरात पसरला आहे. शहर परिसरात या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या सर्वांवर शहर महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी डॉक्टर आणि परिचारिका चांगले काम करत आहेत. कोरोना विषाणूबाबत पालिकेने दिलेल्या सुचनांना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम पालिका कर्मचारी चांगल्या प्रकारे करत आहेत. शहरावर आलेल्या या परिस्थितीवर पालिका आयुक्तांपासून सर्व कर्मचारी लक्ष देऊन काम करत आहेत. या सर्वांचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी आभार मानले आहेत.