मुंबई - लांबलेल्या पावसाने मुंबईत दमदारपणे सुरुवात केली असून मागील चार दिवसांत ८५ टक्के इतका पाऊस झाला आहे. सलग चार दिवस पाऊस पडत असून सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रस्ते आणि रेल्वे सेवा कोलमडली. सायन, किंग्ज सर्कल रेल्वे रुळावर पाणी भरले होते. मुंबईतल्या सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यावरील वाहतूकही खोळंबल्याने मुंबईकरांचे हाल झाले. मुंबईकर ऑफिसला उशिरा पोहचल्याने लेटमार्कही लागला. येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
रविवारी सकाळी जोरदार पाऊस कोसळून दुपारनंतर काही तास उघडीप घेतली व रात्री पुन्हा जोरदार बरसला. पावसाची संततधार सोमवारीही सकाळपासून कायम राहिल्याने मुंबईतील सखल भागात जागोजागी पाणी साचले होते. गांधी मार्केट, किंग सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, चेंबूर, शेलकॉलनी, चेंबूर कॉलनी, आरसीएफ कॉलनी, प्रतीक्षा नगर, मिलन सबवे, अंधेरी सबवे, वांद्रे आदी ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. किंग्ज सर्कल, गांधी मार्केट, प्रतिक्षा नगर येथे गुडघाभर पाणी साचले होते. किंग्जसर्कल, सायन येथील रेल्वे रुळावर पाणी साचल्याने या मार्गावरून जाणा-या प्रवाशांचे हाल झाले. तिन्ही मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावल्याने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी झाली होती.
धारावी येथील मुख्याध्यापक नाला डेब्रिज, प्लास्टिक, फ्लोटींग मटेरियलने तुंबल्याने तेथे पाण्याचा निचरा करणा-या पंपामध्ये हा सर्व कचरा अडकून हा पंपच बंद पडला. त्यामुळे येथे पाणी निचरा करता न आल्याने परिसरात पाणी तुंबले होते. दादर येथील हिंदमाताजवळ नेहमीप्रमाणे यंदाही पाणी तुंबले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून ब्रिटानिया पंपिंग स्टेशन बांधूनही पाणी तुंबण्याची समस्या सुटलेली नाही. येथे मायक्रो टनेलिंगची कामे सुरु आहेत, मात्र त्या ठिकाणची जुनी खोलवर रुजलेली ५२ झाडे या कामासाठी अडथळा ठरत आहेत. त्यामुळे ही समस्या ही झाडे काढल्याशिवाय सुटणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सकाळी ११ वाजता हाईटाईड होती. मात्र, याचवेळी नेमका पाऊस थांबला होता. पाऊस जोरदार कोसळला असता तर मुंबई तुंबली असती.
शहरातील विविध दुर्घटना