मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, बीड आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर यासह खान्देशातील नंदूरबार आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. गोदावरी नदीवरील जायकवाडी, बीडमधील बिंदुसरा आणि नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विविध तालुक्यांत ओढ्या-नाल्यांना पूर आल्याने पूल पाण्याखाली जाऊन रस्ते बंद झाले आहेत. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असताना पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन, मूग पिकांचे नुकसान झाले आहे.
लातूर : औसा तालुक्यात मुसळधार पाऊस ; उंबडगा येथील पूल पाण्याखाली
औसा तालुक्यात शुक्रवारी रात्री उशिरा मुसळधार पाऊस झाला. औसा- उंबडगा मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे. उदगीर, निलंगा, लातूर ग्रामीण तसेच औसा तालुक्यातील काही मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसणार असून उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नांदेड : जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती, 'विष्णूपुरी'चे सहा दरवाजे उघडले
नांदेड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मुदखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे सीतानदीला पूर आला आहे. त्यामुळे नांदेड ते मुदखेड हा रस्ता बंद करण्यात आला. मुदखेड ते भोकर, मुदखेड ते बारड हे रस्ते सुद्धा बंद झाले आहेत. विष्णूपुरी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सीतानदीला आलेल्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी, यलदरी, इसापूर, विष्णूपुरी व माजलगाव येथील धरणे भरली आहेत. अनेक नदी-नाले तुडूंब भरून वाहात आहेत.
परभणी : 'गोदावरी'ला पूर! परभणीच्या 5 तालुक्यांतील शेकडो गावांना सतर्कतेचा इशारा
परभणी जिल्ह्यातील 5 तालुक्यांतून गोदावरी नदी वाहते. जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग होत असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या शेकडो गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होऊन कुठल्याही क्षणी पूर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पूर्णा आणि पालमच्या तहसील प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन केले आहे.
बीड : गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; बिंदुसरा ही ओव्हरफ्लो
जायकवाडी धरणाचे पाणी सोडल्यामुळे तसेच गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. बीड जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावच्या परिसरातील काही छोट्या गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत समाधानकारक पाऊस पडला असून बीड तालुक्यातील बिंदूसरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील करंजखेड़, चिंचोली, घाटशेन्द्रा भागात मुसळधार पाऊस
कन्नड तालुक्यात घाटशेन्द्रा, चिंचोली, करजखेड भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतामध्ये पाणी शिरले. तालुक्यात सरासरी 749 मिलीमीटर पाऊस होतो; यावेळी 900 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन प्रशासनाने मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.