महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यभरात ७ ते १२ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता - महाराष्ट्र पाऊस

राज्यात आजपासून (७ ऑक्टोबर) पुढील ५ दिवसांपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन कृषी खात्याने केले आहे.

भारतीय हवामान विभाग

By

Published : Oct 7, 2019, 5:00 PM IST

मुंबई - विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रातील काही भागांत ७ ते १२ ऑक्टोबर दरम्यान दुपारनंतर ढगाळी हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे योग्य नियोजन करावे. तसेच काढणी केलेल्या पिकांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

नाशिकसह खानदेश आणि औरंगाबाद जिल्ह्यात ८ ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील. तसेच मेघ-गर्जनेसह पाऊस येण्याची शक्यता आहे, तर नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात काही भागात १२ ऑक्टोबरपर्यंत मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता आहे. लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यासह उर्वरित मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती ११ ऑक्टोबरपर्यंत राहील, तर विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागात १२ ऑक्टोबरपर्यंत काही प्रमाणात ढगाळी हवामान आणि मेघ-गर्जनेसह पाऊस पडेल.

वादळी पावसाची तीव्रता, कालावधी आणि क्षेत्र अधिक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. या कालावधीत शेतकऱ्यांनी दुपारनंतर येणाऱ्या वादळ आणि वीजांपासून आपले संरक्षण करावे. वादळ आल्यास लोकांनी झाडाखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रानजीक आसरा घेऊ नये, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details