मुंबई - प्रादेशिक हवामान विभागाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मध्यरात्रीपासून मुंबईतील काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळीही पावसाचा जोर कायम होता. यामुळे शहरातील काही भागात पाणी साचले आहे.
मुंबई शहरात पावसाची जोरदार हजेरी; पुढील 48 मुसळधार पावसाची शक्यता हिंदमाता परिसरात नेहमीप्रमाणे गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. तसेच आता दादर, परेल, वरळी या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे.
दरम्यान, पुढील 48 तासात मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मराठवाडा तसेच राज्यातील अंतर्गत भागात पावसाचा जोर असेल, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच 1 ऑगस्टपासून कोकणासह मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी अजेयकुमार जाधव यांनी परिस्थितीचा घेतलेला आढावा. आज (मंगळवारी) संध्याकाळी 5.53 मिनिटांनी भरतीची वेळ आहे. यावेळी समुद्रात 3.71 मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. मुंबईच्या कुलाबा वेधशाळेत आज (मंगळवारी) सकाळपर्यत 28 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. उपनगरात 29.7 कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात गेल्या 24 तासात 57.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर उपनगरात 28.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच शहरात 92 टक्के आर्द्रता नोंदवण्यात आलीय. 1 जूनपासून मुंबई शहरात 1596.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे.