मुंबई- गेले चार महिने उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना बुधवारी रात्री पासून पडत असलेल्या पावसाने दिलासा दिला आहे. पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. ठाण्याच्या मखमली तलाव, मुंबईत सायन, हिंदमाता, अंधेरी, कुर्ला आदी सखल विभागात पाणी साचल्याने बेस्टचे बस मार्ग वळवण्यात आले आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेनही उशिराने धावत असल्याने मुंबईकरांना आपल्या नियोजित ठिकाणी जाण्यास उशीर लागत आहे.
MUMBAI RAIN UPDATE :
- दादर येथे पावसामुळे भिंत कोसळली.
- गोरेगाव आणि अंधेरी येथे शॉक लागून ३ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जण जखमी.
- शहरात माझगाव चाळ नंबर ५१ A, ताडदेव बीएमसी गॅरेज, पूर्व उपनगरमध्ये सायन सोनापूर गल्ली, शितल टॉकीज, साकिनाका, घाटकोपर पश्चिम बर्वे नगर, पश्चिम उपनगरात नॅशनल कॉलेज बांद्रा, अंधेरी मेट्रो स्टेशन, मिलन सबवे, अंधेरी सब वे आदी ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी.
- पाण्याचा निचरा करण्यासाठी ६१ पंपाचा वापर.
- सकाळी ८ वाजल्यापासून ११ पर्यंत पूर्व उपनगरात ६४.१४ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात ७८.२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
- मुंबईत पाणी साचल्याने बस मार्गात बदल.
- येत्या ४८ तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
- दादर येथील सेनापती बापट मार्गावरील कामगार मैदान येथे संरक्षक भिंत कोसळून तीन जण जखमी झाले.
जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची प्रतीक्षा असते. मात्र, जून संपता संपता पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाने मुंबईला झोडपून काढल्याने हिंदमाता, घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, चेंबूर, वांद्रे, सायन, वडाळा, अंधेरी सब वे, मिलन सबवे, बोरिवली, मानखुर्द, परळ, दादर आदी सखल भागात पाणी साचले होते. सखल भागात पाणी तुंबल्याने रस्ते वाहतूक वळवण्यात आली.
अंधेरी सबवेत कंबरेपर्यंत पाणी साचल्याने येथील वाहतुकीचा खोळंबा झाला. येथील मोगरा नाला तुंबल्याने परिसरात पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आणि परिसरात पाणीच पाणी साचले होते. चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्ग, शेल कॉलनी येथे रस्त्यावर पाणी तुंबले होते. पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली होती. भांडुप, कांजूरमार्ग येथील रेल्वे ट्रकमध्ये पाणी भरल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक कोंडीमुळे कार्यालयात नियोजित वेळेत पोहचण्यास उशिर झाला.
मुंबईत काल रात्रीपासून पाऊस पडत आहे. तर सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. गेल्या २४ तासात पडलेल्या पावसात शहर विभागापेक्षा पूर्व आणि पश्चिम उपनगरात जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासात (काल रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत) शहरात ३.५० मिलिमीटर, पूर्व उपनगरात १८.२३ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात १०.६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सकाळी ८ वाजल्यापासून ११ पर्यंत पूर्व उपनगरात ६४.१४ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात ७८.२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासून वरळी अग्निशमन केंद्र येथे २७, पूर्व उपनगरात चेंबूर अग्निशमन केंद्र येथे २५ तर पश्चिम उपनगरात गोरेगांव येथे ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या ठिकाणी साचले पाणी -
शहरात माझगाव चाळ नंबर ५१ A, ताडदेव बीएमसी गॅरेज, पूर्व उपनगरमध्ये सायन सोनापूर गल्ली, शितल टॉकीज, साकिनाका, घाटकोपर पश्चिम बर्वे नगर, पश्चिम उपनगरात नॅशनल कॉलेज बांद्रा, अंधेरी मेट्रो स्टेशन, मिलन सबवे, अंधेरी सब वे आदी ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे नोंद झाल्या आहेत.