महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाची संभाव्य दुसरी लाट; आरोग्यमंत्र्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक - Corona measures Rajesh Tope meeting

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक घेतली. यात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर, राज्यभरात फिव्हर सर्व्हेलन्स वाढवणे तसेच खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्याबाबत निर्णय झाला.

Corona measures Rajesh Tope meeting
आरोग्यमंत्री राजेश टोपे

By

Published : Nov 5, 2020, 6:02 PM IST

मुंबई - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची आज बैठक घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच, नागरिकांनी दिवाळी साजरी करताना गर्दी टाळावी आणि खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन आरोग्य मंत्र्यांनी केले.

बैठकीतील निर्णय आणि चर्चेची माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे

सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली, तरी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी यावेळी चर्चा झाली. ज्या रुग्णालयांमध्ये मृत्यू दर अधिक आहे त्या ठिकाणी रुग्णालयस्तरावरच डेथ ऑडिट कमिटी नेमून शासनाला अहवाल देण्याचे यावेळी तज्ञांना संगितले.

५०० लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर भर -

राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्यतो येणार नाही. मात्र संभाव्य लाटेसाठी खबरदारीची उपाययोजना करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली. सध्या राज्यात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यात खंड पडणार नसून उलट अधिक प्रभावीपणे ५०० लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर भर दिला जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यभरात फिव्हर सर्व्हेलन्स वाढवणार -

थंडीमध्ये इन्फ्लुएन्झासारखे आजार वाढतात. त्यामुळे, तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांचे लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधान्य देण्याचे समितीने सुचवले आहे. त्यानुसार राज्यभरात फिव्हर सर्व्हेलन्स वाढवणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.

‘सुपर स्प्रेडर’ च्या चाचण्यांवर भर -

राज्यभरात किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचारी ज्यांचा लोकांशी कायम संपर्क येते, अशा ‘सुपर स्प्रेडर’ यांच्या चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश क्षेत्रिय पातळीवरील यंत्रणेला देण्यात आले आहेत.

डॉक्टर्स, नर्स यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम -

लहान शहरांमधील रुग्णालयांमध्ये आयसीयूमधील डॉक्टर्स, नर्स यांची कमतरता लक्षात घेऊन तेथील कर्मचाऱ्यांना सिम्युलेशन लॅबच्या सहायाने प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा राखीव -

राज्यात सध्या कोरोनासाठी ज्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तसेच, जी सुविधा निर्माण करण्यात आली आहे, ती कायम ठेऊन त्यात अजून वाढ करण्याचा प्रयत्न करतानाच खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णयही कायम राहील. त्याचप्रमाणे टास्क फोर्सने जी आदर्श उपचार कार्यपद्धती तयारी करून दिली आहे, त्यानुसार उपचार करण्याचे टोपे यांनी आवाहन केले आहे.

दिवाळीत अधिक खबरदारीचे आवाहन

आगामी दिवाळी सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो. त्यामुळे, यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्मयंत्र्यांनी केले. महाराष्ट्र फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

याबैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डेथ ऑडिट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे, राज्य साथरोग नियंत्रण दक्ष समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा-'नाट्यगृह भाड्याबाबत सकारात्मक विचार करणार'

ABOUT THE AUTHOR

...view details