मुंबई - केंद्र सरकार मदत करत आहे मात्र, ती अपेक्षेप्रमाणे नाही. महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना केली असता, गुजरातची लोकसंख्या किती? महाराष्ट्राची लोकसंख्या किती? याचा विचार करायला हवा. गुजरातला 1 कोटी लसी दिल्या व महाराष्ट्राला 1 कोटी 4 लाख लसी दिल्या. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आहेत. आम्हाला एका आठवड्यासाठी लागणाऱ्या लसी द्या, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. ते याची दखल घेतील, अशी अपेक्षा असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. आम्ही पारदर्शक पद्धतीने कारभार करत आहोत. सर्व चाचण्या केंद्र सरकारच्या निर्देशानुसार करत आहोत. महाराष्ट्रात 70 टक्के आरटीपीसीआर आणि 30 टक्के अँटिजेन चाचण्या होतात. उत्तर प्रदेशात 90 टक्के अँटिजेन टेस्ट होतात. मात्र, मुंबई आणि पुण्यामध्ये उलट असून टेस्टिंग वाढवले आहे. दहा लाखांमागे तीन ते चार लाख लोकांचे टेस्टिंग सुरू आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.
केंद्र आणि राज्याने हातात हात घालून काम करावे -
महाराष्ट्रासाठी 30 जिल्ह्यांमध्ये केंद्राच्या टीम आलेल्या आहेत. त्या लसीकरण, रेमडेसिवीर, उपलब्ध सोयी-सुविधा यांची माहिती घेणार आहेत. महाराष्ट्र हे 50 टक्के शहरीकरण झालेले राज्य आहे. त्यामुळे त्याची इतर राज्यांशी तुलना करता येणार नाही. आम्हाला जनतेची काळजी आहे. त्यामुळे वाद न घालता हातात हात घालून केंद्र आणि राज्याने काम केले पाहिजे. राज्यात आठवड्याला 40 लाख वॅक्सिन लागते. लसी अभावी सातारा, सांगली , पनवेलमध्ये लसीकरण बंद पडले आहे. याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दिली आहे. तसेच, हापकिनला लस बनवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी देखील केल्याचे टोपे यांनी सांगितले.