मुंबई- शहरातील जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यात आणखीनच गंभीर झाला आहे. विक्रोळी येथील कन्नमवार नगरमध्ये म्हाडा वसाहतीतील जुनाट इमारती कधीही कोसळतील, अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एका इमारतीचा काही भाग कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास इमारत क्रमांक १८६ चा गॅलरीचा भाग कोसळला. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तसेच स्थानिक पोलिसांनी धाव घेत ही इमारत खाली केली. ही इमारत ३५ ते ४० वर्षे जुनी आहे.