मुंबई- राज्यातील आरटीओमध्ये वाहन परवाना काढताना वाहन चालविण्याच्या परीक्षेसाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग करावे लागते. मात्र, मुंबईसह ठाणे व पुणे या मेट्रो शहरांमधील काही आरटीओंमध्ये पुढील तीन महिन्यांत एकही स्लॉट उपलब्ध नसल्याने शिकाऊ वाहन चालकांच्या त्रासात भर पडत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन आयुक्तांनी समस्येवर उपाय शोधण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीमुळे परवान्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे दिसत आहेत.
परिवहन विभागाला मोठे यश -
मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या मेट्रो शहरांमध्ये वाहनांच्या संख्येसह वाहन चालकांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी, उप प्रादेशिक परिवहन कार्यालया(आरटीओ)मध्ये शिकाऊ व इतर परवाने काढण्यासाठी गर्दी होत आहे. यावर तोडगा म्हणून परिवहन विभागाने घरबसल्या शिकाऊ परवाना काढण्याची सुविधा काहीच महिन्यांपूर्वी सुरू केली. मात्र, शिकाऊ परवाना घेतलेल्या चालकांना एक महिन्यानंतर पक्का परवाना काढण्यास आवश्यक चाचणी देण्यासाठी आरटीओमध्ये जावे लागत आहे. आरटीओमध्ये जाताना पूर्व नोंदणी किंवा स्लॉट बूक करणे परिवहन विभागाने बंधनकारक केले आहे. ऑनलाइन स्लॉट बुकिंगमुळे दलालांना आळा घालण्यात परिवहन विभागाला मोठे यश आले आहे. मात्र, मुंबईसह ठाणे व पुणे या मेट्रो शहरांमधील काही आरटीओंमध्ये पुढील तीन महिन्यांत एकही स्लॉट उपलब्ध नसल्याने शिकाऊ वाहन चालकांच्या त्रासात भर पडत आहे.