मुंबई - कुर्ला रेल्वे स्थानकातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेवरील पादचारी पूल बंद करण्यात आला. त्यानंतर नुकताच मंगळवारी पूर्व -पश्चिम दिशेला जोडणारा महापालिकेचा पादचारी पूलही बंद करण्यात आला. त्यामुळे हार्बर मार्गावरील फलाट क्रमांक 7 आणि 8 वरील पुलावर पादचारी एकच गर्दी करत असल्याने गर्दी आवरण्यासाठी आरपीएफ आणि जीआरपीची कसोटी लागत आहे.
जुन्या पुलाचा धोका पूल बंद केल्यामुळे कमी झाला आहे. जे पूल चांगल्या अवस्थेत आहेत, त्यावर येणारा गर्दीचा ताण यामुळे कुर्ला स्थानक संवेदनशील होत आहे. दोन्ही पूल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले असून पावसाळ्यापूर्वीच हे पूल पाडण्याचे मध्य रेल्वेने ठरवले आहे.
पूर्व-पश्चिम जाणारा कोणत्याही फलाटाला न जोडलेला नागरी पादचारी पूल अचानक मंगळवारी बंद करण्यात आला. मात्र, येथील उपलब्ध भुयारी मार्गाचा महिला, लहान मूलांकडून जास्त प्रमाणात वापर केला जात नव्हता. कारण त्यात असुविधा आणि सुरक्षा व्यवस्था नव्हती. पादचारी पूल बंद केल्यानंतर महानगरपालिकेने पूलातील घाण पाण्याचा निचरा केला असून विजेची व्यवस्था पूर्ववत केली आहे.
आतील गर्दुल्ले आणि इतर लोकांना तेथून हटवून सफाई केली आहे. त्यामुळे नागरिक पूर्व-पश्चिम दिशेला जाण्यासाठी भुयाराचा वापर करत आहेत. आयआयटीने मध्य रेल्वेवरील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या सर्व बांधकामाचा आढावा घेणाचे काम पूर्ण केले आहे. मध्य रेल्वेवर २९९ बांधकामे असून त्यातील सर्व बांधकामांचा आढावा घेण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ आयआयटीकडून केवळ सर्व पुलाबाबतचा आढावा अहवाल येणे शिल्लक आहे.