मुंबई- विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील निवडणूक १ डिसेंबरला होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. पुणे, औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर तर पुणे व अमरावती शिक्षक या पाच मतदारसंघांतील निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी सर्वसाधारण आचारसंहिताही लागू होईल. या निवडणुकांच्या निमित्ताने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका नेमक्या कशा होतात?, या विषयी आपण अधिक जाणून घेऊ.
पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रथम विधान परिषदेची रचना समजून घ्यावी लागेल. विधान परिषद हे महाराष्ट्राच्या विधीमंडळामधील वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाचे एकूण ७८ सदस्य (आमदार) असतात. येथील आमदारांची थेट जनतेतून निवडणूक होत नसून विविध स्तरांतून सदस्य निवडले जातात. दर दोन वर्षांनी सभागृहातील १/३ सदस्य निवृत्त होतात आणि तेवढेच नव्याने निवडले जातात.
अशी होते आमदारांची निवड
- एकूण ७८ आमदारांपैकी १/३ म्हणजे २६ आमदार हे विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात. म्हणजे यांच्या निवडणुकीसाठी विधानसभेचे आमदार मतदान करतात.
- त्यानंतर १/३ म्हणजे २६ आमदार हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. म्हणजे यांच्या निवडणुकीसाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींचे सदस्य मतदान करतात.
- त्यानंतर १/१२ म्हणजे ७ आमदार हे शिक्षक मतदारसंघामधून निवडले जातात. म्हणजेच निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेले शिक्षक यासाठी मतदान करतात. (सभागृहात एकूण ७ आमदार शिक्षक मतदारसंघातील असतात)
- त्यानंतर १/१२ म्हणजे ७ आमदार हे पदवीधर मतदारसंघामधून निवडले जातात. म्हणजेच निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेले पदवीधर यासाठी मतदान करतात. (सभागृहात एकूण ७ आमदार पदवीधर मतदारसंघातील असतात)
- त्यानंतर उरलेले १/६ म्हणजे १२ आमदार हे राज्यपाल नियुक्त सदस्य असतात. म्हणजेच यांची नियुक्ती राज्यपाल करतात. यामध्ये कला, क्रीडा, साहित्य इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांची निवड होणे अपेक्षित असते. अशाप्रकारे एकूण ७८ आमदार निवडले जातात.