राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते डबेवाल्यांना सायकल वाटप
श्री साईश्रद्धा प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या.
मुंबई- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (सोमवारी) मुंबईतील डबेवाल्यांना राजभवन येथे सायकल वाटप करण्यात आले. यावेळी १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या. परोपकार करण्याची क्षमता ईश्वराने केवळ मनुष्याला दिली आहे, त्याचा माणसाने सदुपयोग केला पाहिजे. आपल्या देशात गरिबात गरीब व्यक्तिमध्ये आपल्या ताटातील अर्धे जेवण दुसऱ्या गरजूला देण्याची भावना आहे. अशा परोपकारी लोकांमुळेच समाज जिवंत राहतो, असे कोश्यारी यांनी सांगितले.
मुंबईतील सर्व डबेवाले मेहनत करून लोकांना जेवण पोहोचविण्याचे पुण्यकर्म करीत आहेत. चांगले काम करणाऱ्याला ईश्वर नेहमी मदत करीत असतो. आज डबेवाले सायकलवरून फिरत असले तरी त्यांची मुले शिक्षणाच्या माध्यमातून स्वकर्तृत्वावर प्रगती करून मोटार आणि विमानाने फिरतील असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. श्री साईश्रद्धा प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई डब्बावाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर उपस्थित होते.
यावेळी श्री साईश्रद्धा प्रतिष्ठानचे शुभ्रांशु दिक्षीत यांनी प्रास्ताविक भाषणातून प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात केलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. कोरोना काळात अनेक डबेवाल्यांच्या सायकली बंद पडून बिघडल्या व त्यांचा रोजगारही गेला. या सर्वांना पुन्हा रोजगार मिळावा व त्यांची आर्थिक घडी बसावी या उद्देशानेसायकल वाटप करण्याचे ठरवले, असे त्यांनी सांगितले.