महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारी विमान नाही आले तर खासगी आहेत की; राज्यपालांचा राज्य सरकारला चिमटा

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विमानप्रवासावरून राज्यात पुन्हा वाद निर्माण झाला आहे. राज्यसरकारने राज्यपालांना सरकारी विमान नाकारले. त्यामुळे विमानात बसलेल्या राज्यपालांना खाली उतरावे लागले. त्यानंतर राज्यपाल खासगी विमानाने रवाना झाले.

Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

By

Published : Feb 12, 2021, 6:35 AM IST

मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्य शासनामध्ये सरकारी विमान प्रवासावरून वादंग निर्माण झाला आहे. या मुद्द्यावरून सध्या महाविकास आघाडी सरकरा आणि भाजप एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या वादावर भाष्य केले आहे. सरकारी विमान न मिळाल्याने खासगी विमानाने प्रवास केल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारला चिमटा काढला.

काय आहे प्रकरण -

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उत्तराखंडामधील मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अ‌ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या सांगता समारोपाला जायचे होते. त्यानंतर ते हिमकडा कोसळून दुर्घटना झालेल्या ठिकाणी देखील जाणार होते. त्यानुसार ते १० फेब्रुवारीला सकाळी मुंबई विमानतळावर पोहोचले. मात्र, सरकारी विमान प्रवासाला परवानगी नसल्याने त्यांना पुन्हा राजभवनात परतावे लागले. या प्रकारावरून भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. शिवसेनेकडूनही राज्यपाल विमान प्रवासावर तिरकस प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. यावर राज्यपाल कोश्यारी यांनी प्रतिक्रिया देताना, सरकारी विमान न मिळाल्याने आपण खासगी विमानाने आलो, असे म्हटले आहे. यावर आता राज्य सरकार काय प्रतिउत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानपरिषदेच्या १२ जागेवरूनही सुरू आहे वाद -

विधानसभेचे अधिवेशन येत्या १ मार्चपासून सुरू होत आहे. अवघ्या १५ दिवसांचा अवधी असतानाही अद्याप १२ राज्यपालनियुक्त सदस्यांना मंजुरी दिलेली नाही. महाविकास आघाडीने याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. आता विमानप्रवासाच्या नव्या वादाने ठाकरे सरकार आणि राज्यपालांमधील दरी रुंदावण्याची शक्यता आहे.

मंदिरे उघडण्यावरूनही झाला होता वाद -

राज्यात लॉकडाउन असताना राज्यातील मंदिरे उघडण्यावरून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्या वाद झाला होता. राज्यातील मंदिरे बंद असण्याच्या मुद्यावरुन राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी, उद्धव ठाकरे यांच्यावर, हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे करत टीका केली होती. तुम्हीही धर्मनिरपेक्ष झालात का अशी विचारणा करत, एकीकडे सरकार बार, रेस्टारंट खुले करत आहे. पण देवीदेवतांची मंदिरे अजून ही बंद आहेत. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. हे सार्वजनिकरित्या मान्य करता. अयोध्येला आणि पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीची पूजाही केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही कोरोना मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी, अशी मागणी या पत्रात कोश्यारी यांनी ठाकरे यांच्याकडे केली होती.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details