मुंबई - हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या कुटुंबीयांना शासनाच्या माध्यमातून शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर आरोपीला कठोर शिक्षा मिळावी. शासनाकडून यासंदर्भात लेखी आश्वासन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिचा मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका पीडितेच्या कुटुंबीयांनी घेतली. यावर गृहमंत्री देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होते.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी चौकात सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. यामध्ये ती ४० टक्के भाजली होती. तसेच तिचा चेहरा, श्वसननलिका पूर्णपणे जळाली होती. तिच्यावर नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज आठव्या दिवशी सोमवारीच तिची मृत्यूशी झुंज संपली.