मुंबई- वादग्रस्त ठरलेले मेट्रो-3 कारशेड अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मेट्रोचे कारशेड आरेमधून रॉयल पाममध्ये हलवण्यात येणार आहे. याबाबत 'सेव्ह आरे'च्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रॉयल पामची जागा सरकारने का कारशेडसाठी निवडली याबाबत खुलासा करण्याची मागणी आरे बचावडून होत आहे.
आरेत कारशेड उभारणीला शिवसेनेने विरोध केला होता. आता हे कारशेड आरेपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या रॉयल पाममध्ये हलवण्याची तयारी सुरू आहे. आरेतील कारशेडला विरोध होत असताना रॉयल पामने काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. कारशेडसाठी रॉयल पामचा विचार करण्यात यावा, असे रॉयल पामकडून पत्रात नमूद करण्यात आले होते. असेच एक पत्र रॉयल पामने वनशक्ती या आरे संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थेलादेखील पाठवले होते. रॉयल पाम प्रायव्हेट लिमिटेडच्या महाव्यवस्थापकांनी कारशेडसाठी 30 ते 60 एकर जागा देण्याचे ठरवल्याने याबाबत सांशकता व्यक्त होते आहे.