मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी मेल-एक्सप्रेसमधून गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या तरुणाला संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहम्मद सैफअसगर अली चौधरी असे त्या तरुणाचे नाव आहेत. तो उत्तरप्रदेशमधून मुंबईत अभिनेता बनण्यासाठी आला होता. मात्र, काम न मिळाल्यामुळे उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांने चोरी करण्यास सुरुवात केली.
कोकणात जाणाऱ्या मेल एक्सप्रेसमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून मुंबई ते पनवेल मार्गावर प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. तीन वर्षांपासून मोहम्मद सैफ धारावी याठिकाणी भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. चोरी केल्यानंतर सोन्याचे दागिने पनवेल येथील सोने गाळणीचे काम करणाऱ्या साबीर असरुद्दीन शेख याला विकत असल्याचे समोर आले. पोलिसांनी साबीर शेखलादेखील अटक केली आहे. पोलिसांनी १६ गुन्ह्यातील १२ लाख ९२ हजार एकशे पन्नास रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. रात्री आणि पहाटेच्या वेळी गाडीचा वेग कमी असताना किंवा सिग्नलसाठी गाडी थांबण्याच्या तयारीत असतानाच प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागीने लंपास करीत होता.