मुंबई :शहरातील एमआरए मार्ग येथील पोलीस कॉलनीत फसवणुकीची घटना घडली आहे. भामट्याने चक्क मुंबई पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीला 3.6 लाख रुपयांचा गंडा घातला. कस्टम अधिकारी असल्याचे भासवून भामट्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची फसवणूक केली. याप्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर झाली ओळख :पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीचे नाव मनीषा अनिल करे (वय 25) असून त्या एमआरए मार्ग पोलीस कॉलनी राहतात. मनीषा करे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वैभव नरदे (३२) याने सोशल मीडियावर तिच्याशी मैत्री केली. नरदेने करे यांना आपली ओळख सीमा शुल्क अधिकारी असल्याचे करुन दिली. नरदेने मनीषा करे यांना सांगितले की, जेव्हा तो एक केस सोडवेल तेव्हा त्याला बक्षीस म्हणून सोने मिळणार आहे. हेच सोने घेण्याच्या नादात मनीषा करे यांची फसवणूक झाली.
स्वस्तातील सोने पडले महागात : काही दिवसांनंतर, फसवणूक करणाऱ्याने पीडितेला सांगितले की, सीमाशुल्क विभागाने त्याला बक्षीस म्हणून सोने दिले आहे. हे सोने त्याला विकायचे आहे असे सांगितले. या सोन्याचा दर त्याने कमी सांगितला होता, स्वस्तात सोने मिळत असल्याने मनीषा करे ह्या ते सोने खरेदी करण्यास तयार झाल्या. नऊ तोळे सोन्यासाठी 3.5 लाख रुपये द्यावे लागतील, असे बनावट कस्टम अधिकाऱ्याने मनीषा करे यांना सांगितले.
फसवणूक झाल्याचे समजले :करे यांनी 11 एप्रिल रोजी नरदे यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर फसवणूक करणाऱ्याने पीडितेला टाळण्यास सुरुवात केली. करे त्याला फोन करायच्या पण नरदे हा त्यांना प्रतिसाद देत नव्हता. त्यानंतर तिला कळले की, तिची फसवणूक झाली आहे. पीडितेने एमआरए मार्ग पोलीस स्टेशन गाठले आणि संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा पती मुंबई पोलिसात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे.