मुंबई- माहीम परिसरातील मगदूम शहा बाबा दर्ग्याच्या पाठीमागे असलेल्या समुद्रकिनारी 2 डिसेंबर रोजी एका सुटकेस आढळली होती. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीचे हात-पाय आढळल्यामुळे खळबळ उडाली होती. या गुन्ह्यात खून झालेल्या व्यक्तीचे बेनेट रिबेलो नाव असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय दत्तक मुलीला व तिच्या 16 वर्षाच्या अल्पवयीन प्रियकराला अटक केली आहे.
असा लागला छडा -
पोलिसांना समुद्रकिनारी आढळून आलेल्या सुटकेसमध्ये काही कपडे सुद्धा मिळाले होते. या कपड्यांवर अलमो मेन्स वेअर अशा नावाचा टेलर मार्क आढळून आला. या अनुषंगाने पोलिसांनी कुर्ला परिसरातील टेलरकडे चौकशी केली. टेलरकडील पावती पुस्तकांचे बारकाईने बारकाईने परीक्षण केले असता, एका बिल पुस्तकांमधील कपड्याचा नमुना सुटकेसमध्ये सापडलेल्या शर्ट सोबत मिळून आला. या संदर्भात पोलिसांनी आयुब नावाच्या युवकाची चौकशी केली असता त्याच्याकडे सुटकेसमधील मिळता-जुळता शर्ट आढळून आला.
हेही वाचा - बेळगाव सीमाप्रश्न : मुख्यमंत्र्याकडून दोन-समन्वयक मंत्र्याची नियुक्ती, प्रत्येक महिन्याला आढावा बैठक
आयुबचा या खूनाशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. तेव्हा आणखी एका पावती पुस्तकात त्याच कलरच्या कापडाचा नमुना व बेनेट नाव आढळून आले. केवळ एक हात, एक पाय व गुप्तांग आढळून आल्याने पोलिसांकडे मृत व्यक्तीची ओळख करणे कठीण होते. मात्र, पोलिसांनी मयत व्यक्तीचे फेसबुक प्रोफाईल पहिले त्यावेळी बेनेट रिबेलो नावाच्या व्यक्तीचे फेसबूकवरील स्वाक्षरी असलेला फोटो व पावती पुस्तकावरील स्वाक्षरी मिळून आली. यावरून सुटकेस मधील अवयव हे बेनेट रिबेलो याचेच असल्याचे तपासात समोर आले.