मुंबई - लालबाग,परळ आणि काळाचौकी या गिरणगाव विभागातील वैद्यकीय क्षेत्र, पोलीस विभाग आणि सामाजिक क्षेत्रातील महिलांना गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान ‘गिरणगावचा पाडवा’ या शोभायात्रेत भारतमातेच्या पालखीचा मान देण्यात येणार आहे. यासोबतच सामाजिक क्षेत्रात रुग्ण सेवा आणि ईश्वर सेवेसाठी कार्यरत असणारी परळमधील ‘नाना पालकर रुग्ण सेवा समिती’ या संस्थेस ‘गिरणगावभूषण पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
मराठमोळ्या सणाचा जल्लोष घुमणार, गिरणगावात असा साजरा होणार पाडवा
गिरणगाव हे उत्सवाचे माहेरघर आहे. गिरणगावची सांस्कृतिक परंपरा व ऐक्य जतन करण्याचे काम आम्ही या शोभायात्रेतून करु, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या शोभायात्रेत दुर्गवीर प्रतिष्ठानच्या महिलांचे दांडपट्टा सादरीकरण, स्वयंसिध्द महिला मंडळाचे पारंपारिक वेशभूषेतील मराठमोळ्या खेळांचे सादरीकरण, बालविकास मंडळ, काळेवाडी यांचे महिलांचे लेझीम पथक, नृत्यदर्शन नृत्यालयाचे कथक सादरीकरण आणि बाईकस्वार महिलांचा स्त्रीशक्तीचा जागर हे या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण असेल. हिंदू नववर्षानिमित्त समितीच्या वतीने या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. यंदाही या शोभायात्रेचा शुभारंभ ढोल-ताशांच्या गजरात परळ येथील स्वामी समर्थ मठातून शनिवारी ६ एप्रिलला सकाळी ७ वाजता होईल आणि शोभायात्रेचा समारोप चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुक्ता जयहिंद सिनेमागृह इथे होणार आहे.
या शोभायात्रेत श्री शिवराय चित्ररथ, १५ फूट उंचीची भारतमातेची प्रतिमा, देवभूमी महाराष्ट्र संस्कृती चित्ररथ, मल्लखांब योगा, हेदेखील होणार आहेत. यात सामाजिक, धार्मिक, राष्ट्रभक्ती आणि दहशतवादासारख्या विविध विषयांवरील चित्ररथ असणार आहेत. गिरणगाव हे उत्सवाचे माहेरघर आहे. गिरणगावची सांस्कृतिक परंपरा व ऐक्य जतन करण्याचे काम आम्ही या शोभायात्रेतून करु, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.